शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

सेवा

अवर्णनीय ! सुंदर !! फारच सुंदर !!! फारच छान !!!!

ही जी कांही कर्तव्यें आपल्या गुरुबंधू-भगिनींकडून पार पाडली जाताहेत, ती खरोखरीच वाखाणण्याजोगीच आहेत यात तीळमात्र देखील शंका असू नये. 

यात प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे आपल्या सद्गुरूंमाऊलींप्रती असणारी आपली आस्था, आपली कळकळ, आपले प्रेम, आपले ऋणानुबंध, आपली कर्तव्यनिष्ठा, आपली तळमळ. यामुळे येथे कोणालाही कुठल्याही कामाचा बोजा न वाटता, तो आनंदाने ही कर्तव्यें पार पाडण्यासाठी सदैव तयार व तत्पर देखील असतो, त्याशिवाय तो प्रत्येक कर्तव्यात न चुकता हजर देखील असतो व राहण्याचा प्रयत्न देखील करीत असतो. यदाकदाचित काही कारणाने म्हणा अथवा त्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्याला जर अशावेळेस हजर राहता नाही आले, तर मात्र तो मनापासून हिरमुसला होतो, आपली आपल्या सद्गुरूंप्रती कार्य करण्याची एक संधी हुकली म्हणून तो प्रसंगी दु:खी देखील होत असतो. 

तरी या सर्वस्वांच्या या तळमळीबद्दल, कळकळीबद्दल किती लिहावं तेवढे कमीच होय. 

हो ! हे जरी खरे असले तरी ही एक गोष्ट नाकारता येणार नाही ती की ही संधी आपणां सर्वस्वांना आपली सद्गुरू माऊलीच वेळोवेळी उत्पन्न करून देत असते व त्यामुळेच हे कठीण कार्य आपण बिनदिक्कतपणे पार पाडू शकत असतो, अन्यथा हे शक्य नसते आणि आपणाकडून झाले ही नसते. म्हणूनच आपण सर्वस्व त्या आपल्या सद्गुरू माऊलींचे सदैव ऋणी आहोत.

जय श्री सद्गुरू माउली !
तू आम्हां भक्तांची सावली !!
करी दया आम्हांवरी इतुकी !
की सेवा करूनी घेसी तितुकी !! 
.......ती आम्हा पेलवे जितुकी !!!

आम्ही काय तुझी सेवा करणार ?
ती संधी तुच आम्हांला देणार !!
तुझीया मनी जेव्हां ते येणार,
तेव्हांच ती, तु आम्हां कडून करुन घेणार !!

त्यासाठीच आम्ही तळमळणार,
ती मिळविण्यासच आम्ही धावणार,
ती मिळताच आम्ही तृप्त होणार
शेवटी अपुल्या चरणी स्थीरावणार !!

अनगड म्हणे, 
*बा ! सद्गुरू राया*
*झिजवू आम्ही अमुची काया*
*स्थिरावेल अमुची माया*
*तुझीया सत्ते*!!!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

नावात काय आहे?

अनगड आणि आनंद. या दोहोंचा संधी होताच "अडगडानंद" होतो. तसाच संगम भक्त आणि भगवंताचा, भगवंताच्या नामानेच होतो. भक्त जेव्हा "नामस्मरणात दंग होऊन जातो, एकलय होऊन जातो", त्याचवेळेस भगवान त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि आपले दर्शन देतात आणि म्हणतात, "बाळा, बघ ! मी कसा ह्या त्रिभूवनात भरून राहिलो आहे ! बघ, मी ह्या त्रिभूवनात भरून राहिलेला असून देखील अलिप्त सुद्धा आहे."

अवघा आनंदीआनंद जहाला की अनगड काय किंवा अनगडानंद काय? एकूण सगळे सारखेच की. सारेची त्या माऊली पुढे नतमस्तकच असतात. 

अनंताचा तो "आ" आणि नंदाचाही "आ" च. म्हणजेच अनंत येणे "निराकार" आणि नंद म्हणजे "आकार", येणे नाम सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस "निराकार" "आकार" घेतात, त्याचवेळेस ते मानवी त-हेने अपुल्या चर्मचक्षूंना दिसून येत असतात. अन्यथा आपण त्यांना फक्त "नामस्मरणाच्या" गतीने गेल्यासच समाधी अंगाने पाहू शकू.

ज्या ज्या वेळी भूतलावर भगवंताची आवश्यकता असते, त्या त्या वेळी "निर्गुण" हे अवतारकार्य धारण करून म्हणजेच अवतार घेऊन पृथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात. याचाच अर्थ असा की "निर्गुण" "सगुण" रुपाने अवतरीत होऊन मानवी त-हेने अपुला कार्यभार सांभाळीत असतात, परंतु आपली जाण मात्र कुणालाच देत नाहीत.

ह्या दोघांचाही जेव्हा कृपाशीर्वाद मिळतो, तोची आनंदाने प्रगट होतो, तेथे मग द्वैत भावना न राहता अवघा आनंदीआनंद भाव तेवढा उरतो. 

शेवटी मानवी त-हेने कोणीतरी म्हटलेले आहेच की नावांत काय आहे? नांव महत्त्वाचे नसून, एखाद्याचे काम अर्थात कार्य महत्त्वाचे असते. कर्तव्य महत्त्वाचे असते.

संतांनी तर त्याहीपुढे जाऊन सांगितले आहे की "ते नाम सोपे रे"....... म्हणून मानवी नावाला महत्त्व न देता आपण अज्ञ बालकांनी आपल्या सद्गुरू नामावर भर देऊन, त्यांचे नामस्मरण करने हितकारक ठरावे.

अनगडाला आनंद झाला, म्हणूनी तोची अनगडानंद जहाला. बाकी मानवी त-हेने बघितले तर नावांत काय आहे? 

याउलट अध्यात्म्याच्या दृष्टीने पाहता, नामातच सगळे भरलेले असून, आपल्या भगवंताच्या चरणांप्रत पोहचण्यासाठी नामस्मरण करने अत्यंत आवश्यक आणि गरजेचे देखील आहे.

अनगड म्हणे,  
         "हे देवा, काय करू मी तूझीच सेवा
                   नित्य निरंतर मजला अपुल्या जवळ ठेवा
          "अपुला कधी विसर न होऊ द्यावा
                    हीच विनवणी करीतो मी देवा 
                    (आपुलिया चरणी) !!!