बोले तैसा चाले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोले तैसा चाले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

बोले तैसा चाले.......!!!

बोले तैसा चाले.......!!!
बोले तैसा चाले,
त्यांची वंदावी पाउले,
साधू तोची ओळखावा,
     देव तेथेची जाणावा
     हे साधुसंतांचे म्हणणे जितके योग्य आहे तितकेच कलियुगामध्ये पुढील म्हणणेही योग्य आहे असे आम्हास वाटते. वरील पंक्तीत थोडासा बदल करून व साधुसंतांची क्षमा मागून, आम्हास असे लिहावेसे वाटते की,

     बोले तैसा (न) चाले,
           त्याची वंदावी काय आम्ही पाऊले (?)
     साधू तोची ओळखावा (की न ओळखावा ?)
           देव तेथेची जाणावा (की न जाणावा ?)
     हे आता या कलियुगामध्ये ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे.
     हे लिहिण्याचे कारण म्हणजे आता सद्य:स्थितीमध्ये जें काय घोटाळे होताना दिसताहेत, त्या घोटाळ्यापासून देव/देवतांची स्थाने/संस्थाने देखील अलिप्त राहिली आहेत असे दिसून येत नाही. आज कोठे घोटाळा? तर ह्या संस्थानात घोटाळा. उद्या कोठे? तर त्या संस्थानात घोटाळा.

     ह्या विवेचानमधील काही शब्द निरखून पहिले तर त्यांची उत्पत्ती कशी काय झाली आहे हे पाहणे उचित ठरेल. उदा. साधू हा शब्द.

     साधू हा शब्द उच्चारला असता, आपल्या डोळ्यांपुढे डोक्यावर पांढरे शुभ्र केस धारण केलेली व पध्दतशीर वळणदारगतीने वरवर जाणार्र्या केसांची मांडणी केलेली दिसून येते, तर मुखापासून खाली रुळणारी पांढर्र्या शुभ्र केसांची दाढी असलेली व्यक्ती पहावयास मिळते. हातामध्ये कमंडलू, तर पायामध्ये खडावा व अंगावर शुभ्र धोतराचे पान ल्यायलेली अशी ती शांत गंभीर मूर्ति डोळ्यासमोर दिसावयास लागते. हे झाले साधू या शब्दाचे वर्णनात्मक स्वरूप.

     परंतु साधू म्हटल्याबरोबर आपणास दृश्यमान होते ती मूर्ति म्हणजे भगवन्ताशी तादाम्य पावणारी व्यक्ती होय. आश्रमाचे शांत व गंभीर वातावरण, आजूबाजूला वृक्षराजी, समोर आश्रमातील शिष्यगण बसलेले आहेत आणि आपण स्वत: वृक्षाखाली चौथर्र्यावर बसलेले असे शांत, निरामय, निरागस, तेज:पुंज ध्यान.

     ह्यांना साधू’ हे नाव कां बरे पडले असावे? जी व्यक्ती साधक आहे (ईश्वरेच्छा बाळगणारी व्यक्ती) व जी आपल्या कृतीतून तसेच आपल्या उक्तीतूनही त्या ईश्वराप्रत आहे हे सदोदित प्रतीत करीत असते, इतकेच नव्हे तर आपल्या बरोबर इतरांनाही त्या ईश्वराप्रत जाण्याचा मार्ग खुला करते व नेण्याचे कार्यही साध्य करते, अशा त्या व्यक्तीला साधू हे नामाभिधान पडले असावे असा अस्मादिकांचा तर्क आहे. (येथे कलीयुगात अभिप्रेत असणा-या संधी-साधू या शब्दाचा अर्थाअर्थी काहीही संबध नाही हे जाणीवपूर्वक लिहावेसे वाटते.)

     परंतु येथे हेही नमूद करावेसे वाटते की कलियुगामध्ये अशाप्रकारे संधी साधणारे साधुही आहेत आणि त्यामुळेच देवाच्या नावाखाली, मठ, दरबार, आश्रम चालविणारे बरेच साधू संत देखील आपणास जागोजागी पहावयास मिळतात. इतकेच नव्हे तर पहिल्या प्रथम म्हटल्याप्रमाणे अशाच व्यक्तींकडून, देवस्थानातून घडत असलेले घोटाळे निदर्शनास येत असतात.

     कलीयुगात सगळे संधी-साधू हे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी संधी-साधुपणा करीत असतात, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी वाटेल त्या थराला जात असतात, त्यामुळे कलियुगातील हे संधी-साधू हे साधू नसून ते संधी-साधुच असतात.

     साधू या शब्दाचा अर्थ साध्य करणारा असावा, न की स + अधू हा असावा. ह्या संधीचा तयार होणारा शब्द हा सुद्धा + अधू म्हणजेच साधू होतो. परंतु + अधू ह्या दोन शब्दांचा शाब्दिक अर्थ घेतला तर तो पुढीलप्रमाणे असण्यास कोणतीच हरकत नसावी. जसे, ‘स’ म्हणजे ‘स्व’ किंवा ‘स्वत:’ आणि ‘अधू’ म्हणजे अपंग. ह्याचाच अर्थ असा की जो स्वत:च अधू किंवा अपंग आहे असा आणि मला वाटते, ह्या कलियुगामध्ये हाच अर्थ अधिक प्रमाणात किंवा योग्य तऱ्हेने या साधूंना लागू होतो.

     कारण ‘कलियुगातील’ ‘साधू’ हे तसे पाहिलेत तर आध्यात्मिक दृष्टीने इतके अधू म्हणजेच अपंग आहेत की ते स्वत;ही परमेश्वराप्रत जावू शकत नाहीत व इतरांनाही ते नेवू शकत नाहीत. त्यामुळे ते एका अर्थाने ‘साधू’ असून दुसऱ्या अर्थाने ते संधी-साधू आहेत असे येथे नमूद करावयास हरकत नाही. कलियुगामध्ये हे दृश्य सगळीकडे दिसून येते तसेच ते अशा साधूंना तंतोतंत लागू देखील पडते.

     कलीयुगात साधू सारखे दिसावे म्हणून हल्लीचे साधू बऱ्याच दृश्य गोष्टींवर भर देऊन आपणां स्वत:ला त्यामध्ये ढाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यासाठी ते दाढी काय वाढवतात, केस काय वाढवतात, अंगावर भगवीवस्त्रे धारण काय करतात, पायात खडावा काय घालतात. हे सगळे वरपांगी ढोंग अंगीकारून आपण साधू असल्याचे सर्वस्वानां दाखविण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत असतात. हे सर्व केल्याने काय तो साधू होणार आहे का? तो देवत्वाप्रत कसा जाणार? आणि इतरांना काय बरोबर नेणार?

     दुसरे असे की कांही धार्मिक स्थानांमधून असे साधू दिसतीलच असे नाही. काही ठिकाणी आपणास कुणी बाबा दिसतील, तर कुणी योगी दिसतील किंवा योगिनी दिसतील. फक्त नामाभिधान वेगळे, परंतु कार्य मात्र तेच. त्यामुळे येथील साधू हा शब्द त्यांना लागू होत नाही अशातला कांही भाग नाही. ज्या साधू-संतांनी अशाप्रकारे वरील पंक्तींचा उहापोह केला आहे, त्यांना अशाठिकाणी, ती ‘व्यक्ती’ अभिप्रेत होती की अगोदरच म्हटल्याप्रमाणे ईश्वराप्रत घेवून जाणारी ती व्यक्ती असावी.

     परंतु हे जरी खरे असले तरी त्यांना हा अर्थ अभिप्रेत होता की अशा मार्गस्थ व्यक्तीने इतरांना मार्गदर्शन करतांना आपणही कांही नीती-नियम पाळावेत आणि म्हणूनच त्यातील एक नियम जो होता – बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले – म्हणजेच जी व्यक्ती सदा-सदैव बोले तैसा चाले म्हणजेच उक्तीप्रमाणे कृती करते किंवा साध्या शब्दात सांगावयाचे झाल्यास बोलल्याप्रमाणे चालते, मार्गस्थ होते किंवा वागते अशा ‘साधुतुल्य व्यक्तीचीच इतरांनी पाऊले वन्दावीत, म्हणजेच अशा व्यक्तीचे पाय धरावेत, त्यांना वंदन करावे, कारण हीच व्यक्ती आपणा सर्वस्वांस त्या ईश्वराप्रत घेवून जाण्याचा मार्ग दाखविणार असते. परंतु कलीयुगात हे घडतांना दिसत नाही, येथे तर नेमके ह्याच्या विपरीत घडत असते. मग अशावेळेस सर्वसामान्यजणांनी कशी बरे अशा व्यक्तींची वंदावी पाऊले?

     दुसऱ्या चरणांतील पंक्ती येथे निश्चितच लागू होतात, त्या म्हणजे – बोले तैसा (न) चाले, त्याची आम्ही कां बरे वंदावी पाऊले? म्हणजेच अशा स्वार्थी, संधी-साधू साधूंना तसेच इतरेजणांना आम्ही कां बरे वंदन करावे? अशा ठिकाणी ईश्वर प्राप्ती होईल कां? अशाप्रकारचे विचार मनामध्ये येणार नाहीत कां?

     तो ‘भगवंत’ तुम्हा-आम्हात ज्योतीच्या स्वरुपात म्हणजेच ज्योतिर्मय आहेच. तो सतात आहे तशाच तो असतात देखील आहे, चांगल्यात आहे तशाच तो वाईटातही आहेच, साधुत’ आहे तसाच तो संधी-साधुतही’ आहेच की, म्हणूनच संधी साधूने जरी उक्तीप्रमाणे कृती केलेली नसेल, करतांना दिसत नसेल तरीही आपण मात्र आपला सताने दाखविलेला मार्ग सोडवायचा नाही आणि तो मार्ग म्हणजेच वंदन करणे. हो, वंदन करणे हा आपला ‘धर्म’ मानून जरूर वंदन करावे, परंतु ते थोडेसे दूर राहूनच. आपल्या मनात सततची ही जाण बाळगून की ‘भगवंत’ सर्वत्र भरलेला आहे आणि म्हणून हे वंदन.

     ह्याचाच अर्थ असा की जळी-स्थळी, काष्टी-पाषाणी, सप्तपाताळ, एकवीस स्वर्ग, चरात-चर, परात-पर, क्षरात-क्षर यामध्ये असून देखील अलिप्त असणारा तो भगवंत असल्यामुळे सर्वस्वांस ‘वंदावे’ ‘नमन’ करावे. परंतु मनामध्ये ही जाणीव सदा बाळगावी की मी माझ्या सताला, मी माझ्या सद्गुरूंना, मी माझ्या भगवंताला, मी माझ्या ईश्वराला नमन करतो आहे. अशा तऱ्हेने जर का आपण त्या सताला, सद्गुरूंना स्मरून कार्य केले, तर त्यामुळे आपणास लाभच होईल. इतरांचे काय होईल त्याची चिंता आपण कां करावी?

     हे जरी खरे असले तरी शेवटी आपण मर्त्य मानवच की हो. त्यामुळे आपणास बऱ्याच गोष्ठी सहन होत नाहीत, आपल्या मनाला पटत नाहीत, त्याचबरोबर आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या कित्येक वर्षांच्या शिकवणीमुळे आपले मन उद्विग्न होते व नाईलाजाने दुसऱ्या चरणांतील पंक्ती आपल्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. मनात घालमेल होऊ लागते. मनामध्ये विचार प्रगटतात – कां बरे लोकं अशी वागतात? कां बरे आपले तेच बरोबर आहे हा हट्टाहास करतात? कां बरे दुसऱ्यांच्या भावनांची कदर करीत नाहीत? कां बरे आपलेच म्हणणे योग्य व खरे असल्याचा दावा करतात? कां बरे आपले तेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात ? कां इतरांना विश्वासात घेत नाहीत ? कां आपला निर्णयच सर्वस्वांवर लादण्याचा प्रयत्न करतात ? कां बरे आपल्या जवळच्या माणसांनी सांगितलेले सगळेच बरोबर आहे असे समजतात व दुसऱ्याला भासवतात ? कां लोकशाही पद्धत झुगारून देऊन हुकुमशाही पद्धत अवलंबितात ? कां इतरांना आडकाठी करतात ? कां त्यांना विचार प्रगट करू देत नाहीत ? कां त्यांच्यावर आपले विचार योग्य नसतानाही लादतात ? कां सताने सांगितलेला मार्ग अवलंबित नाही ? कां बरे तो मार्ग आपल्यासाठी नाही असे त्या समजतात ? कां बरे तो इतरांसाठी आहे, आपल्यासाठी नाही असे समजतात ? कां बरे त्या इतरांवर विश्वास ठेवीत नाहीत ? कां इतरांवर अविश्वास दाखवितात ? कां बोलल्याप्रमाणे वागत नाहीत ? कां बरे शब्दांची फिरवाफिरव करीत असतात ? कां सन्मार्ग विसरतात ? कां मनामध्ये न्यूनगंड बाळगतात ? कां ? कां ? आणि कां ?

ह्या सगळ्या कां ना काहीच उत्तर नाही. ही सगळी काव कावच. ही सगळी कालवाकालवच. हा सगळा कांगावाच. ह्याचे कारण त्यांच्या मनामध्ये उदारता नाही, सहृदयता नाही किंवा स्वत:बद्दल असलेला फाजील आत्मविश्वास किंवा न्यूनगंड किंवा जवळच्यांनी केलेल्या भाटगिरीमुळे अशा व्यक्ती हे सगळे करण्यास धजावत असतात की काय असे वाटू लागते. त्यातच काही वेळेला शिक्षणाचा अभाव हे देखील एक कारण असू शकते. मग कसे बरे मन मोकळे होणार, मोकळे राहणार ? सदोदित जर मी माझेच खरे करीत राहिलो, तर ते योग्य आहे कां ? मग सर्वसामान्य मानव गप्प राहतात व म्हणतात करा बापुडे आपलेच खरे.

याचा परिणाम असा होतो की निर्णय चुकीचे होतात, चुकीच्या निर्णयांमुळे भांड निर्माण होतात, चांगली माणसे लांब जातात, अयोग्य माणसे जवळ येतात व परिस्थिती हाताबाहेर जावू लागताच मग सगळ्यांची आठवण येते. त्यावेळेस आपण किती तोकडे आहोत, ह्याची जाण येऊ लागते. आपण परिपूर्ण नाही ह्याची जाणीव होऊ लागते. तसे पाहिले तर कोणीही १०० टक्के परिपूर्ण नसतोच आणि म्हणूनच समाजामध्ये कार्य करताना एकत्र यावयाचे असते, एकाग्र होऊन कार्य करायचे असते. परंतु आधीच म्हटल्याप्रमाणे स्वत:जवळ एवढा फाजील आत्मविश्वास म्हणा किंवा आणखी काही म्हणा असल्यामुळे ते मानायला मन तयारच होत नाही. मी करीन ती पूर्व ह्याच स्थितीने / गतीने कार्य रेटले जात असते आणि मग एखादे दिवशी अडचणीत यावयास होते. अशावेळी मग सगळ्यांची आठवण होते. हे कितपत योग्य ते ज्याचे त्यानेच ठरवावयाचे.

मी परिपूर्ण नाही, मी काही प्रमाणात का होईना अपूर्णच आहे, ह्याची जाण अशा व्यक्तींना येतच नाही. त्या आपल्याच कोशात मग्न असतात. त्यांना इतरांची तमा वाटेनासी होते. अशावेळी त्या इतरांच्या मदतीची अपेक्षा तर करतात, परंतु आपला अहंपणा मात्र सोडीत नाहीत. आपल्याकडे कमीपणा मात्र घेण्याची मानसिकता दाखवीत नाहीत. आगपाखड करण्याचे काही सोडीत नाहीत. मला इतरांची मदत तर घेतलीच पाहिजे, ह्याची मनामध्ये जाण तर येऊ लागते, पण ओठावर काही येत नाही व मान्य करण्याचे धाडसही त्या दाखवीत नाहीत किंवा त्यांना तसे वाटत नाही. आपले चुकले म्हणण्याचे धाडस देखील करतांना अशा व्यक्ती दिसत नाहीत, याला कारण आपल्यात असणारा अहंभाव. हा अहंभाव जोपर्यंत मानवात आहे, तोपर्यंत वरील वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी घडतच राहणार आणि म्हणूनच मग म्हणावेसे वाटते –

     बोले तैसा चाले,
           त्यांचीच फक्त वंदावी पाऊले,
                अन्यथा सर्वस्व दुर्लक्षावे,
                     अशांपासून थोडे लांबच राहावे.