रविवार, २९ जानेवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग तिसरा ) परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


गेल्या तीस वर्षात जी काही कर्तव्ये या आसनाकडून घडली त्यावरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो कि भक्ति अत्यंत श्रेष्ठ आहे. कितीही महाबलाढ्य ज्योती असोत, आसनाचे आदेश घेवून निघालेल्या ज्योतींसमोर त्यांचे काही चालत नसे. ह्या अघोरांनी सर्व काही प्राप्त करून घेतले होते तरीदेखील आसनाने कर्तव्यासाठी पाठ्विलेल्यांचा त्यांना थांग पत्ता लागत नव्हता. मग आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? भक्ति कि अघोर तप:श्चर्या? तर भक्तीच सर्वश्रेष्ठ. एकाच नामाच्या जोरावर चालणारी हि भक्ति ! अघोरांकडे मात्र अनेक त-हा – मंत्र-तंत्र, ऋद्धी-सिद्धी वगैरे. अघोरांचा नाश करण्याकरिता मार्गदर्शन कोणाचे तर सताचे ! म्हणून या सर्वस्वी अघोरांचा आम्हाला निपा:त करता आला. या सर्वस्वाचे मूळ कोणते तर भक्ति ! भक्तीपुढे अघोर तप:श्चर्या कुचकामी आहे. परंतु आजच्या कलियुगी मानवांना भक्ति एवढी प्रिय वाटत नाही.

तप:श्चर्या करायला हल्लीच्या कलीयुगात मानवांकडे वेळ आहे का? तपस्या करायची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ति करतांना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामाणसात रहा अन् जो काही वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा अन् मला डोळे भरून पहा. आणि हे दोघांचे समीकरण केलेत कि पांचवा प्रणव वेद प्रगट होईल. अन् एकदा का पांचवा प्रणव प्रगटला कि सर्वस्वाचा शोध तुम्ही घेवू शकता. सर्वस्वाचा अंत सत् भक्तिने लावता येतो.

भक्तीत अहंकार सापडणार नाही, तर लीनत्व सापडेल. या राजमार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व ! गुरुदेव कसे आहेत तर अत्यंत लीन अन् शांत. अफाट शक्ती आहे ती ! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळते. यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे ते. भक्ति अभक्तीत लीन होणार नाही अन् अभक्ती भक्तीत लीन होणार नाही.

ज्या अखंड नामाचे आपण स्मरण करीत असतो, त्याला नामस्मरण म्हणतात. त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्तीपुढे कोणाचे काहीहि  चालत नाही, चालणार नाही. अन् अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य त्रिभुवनात कोणाकडेही नाही. या नामाचा नाश हे तपस्वी करू शकणार नाही. हे नाम देखील तपस्व्यांकडे होते, नामरहित तेही नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले, पण त्यांच्याकडे अहंकार होता.

भक्तीचे प्रकार !!!
एक भक्ति अहंकार रहित, तर दुसरी भक्ति अहंकारयुक्त ! ऋषी-मुनी, गुरुदेव, सप्तर्षी यांची भक्ति हि अहंकार रहित भक्ति होय. तर इतरांची भक्ति हि अहंकार युक्त भक्ति होय. अहंकारात षड्-रिपू रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत.                                         पुढे चालू...........(४)

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग दुसरा)


ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, आंधळ्याशी जग सारेची आंधळे !

जरी स्थूलात वा स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरांनी मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही?

अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे. काय मिळवावयाचे आहे? हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता - तर भक्तिमार्ग ! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे, तर भक्तिने ! आपल्याला काटयाकुटयातून जायचे नाही. गिरिकंदरातून जायचे नाही. दगड खड्ड्यातून जायचे नाही. फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहचणार.

अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी पंचवीस अवतार कार्ये झाली पण ॐ काराचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला ना? भक्तिचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ति, दुष्ट बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर, द्वेष याचा नाश झाला.

आपल्याला माहीतच आहे, कोपिष्ट विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ट संयमी, शांत अन् ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत. कधी कधी आम्ही चिडतो, परंतु ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन् त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता ! आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मीही पाळणार नाही. ते कसे दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्या पुढे सर्वजन लीन असतात. ब्रह्मर्षी पद काय आहे त्याची सेवेक-यांनो तुम्हाला कल्पना नाही.  साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन् त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह ! अन् त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता. गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला.

ब्रह्मर्षी पद !!!
ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक आहे ते ब्रह्म. अन् अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट अन् गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरांनी कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ कितीही असो, तरीदेखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहेत. भक्तीच्या पुढे त्यांचे काही चालत नाही. चालणार नाही.

भक्ति म्हणजे काय?
भक्ति म्हणजे काय तर एकच – नामस्मरण ! अन् सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करत या दोघांचे समीकरण झाले म्हणजे तीच भक्ति होय. हि भक्ति इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ति कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत.                पुढे चालू...........(३)

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

सद्गुरू संबंधी विवेचन........!!!

Google Groups
Sadguru Darbar


हे निर्गुण निरंजन नित्यपूर्ण स्वरूपा ! हे त्रिगुनातीत सच्चीदानंदा प्रभो ! तुज एकात्मभावाने नमन असो !! प्रकाशरूप परमात्मस्वरूपी होऊन ब्रह्मांडाचा तू उत्पत्ति-स्थिती-लयकर्ता व प्रेरक होतोस. हृदयाकाशात सूक्ष्म कण प्रकाशमयरुपात असून मन बुध्यादिकान्स प्रेरणा करतोस. तुझ्याच प्रेरणेने स्वस्वरूपप्राप्ती होण्याकरिता लिहिल्या गेलेल्या ग्रंथाचे कर्तृत्व लेखकाकडे नसून तुझ्याकडेच येते म्हणून तुझेच स्मरण करून तुझ्या ठिकाणी लीन होवू.
तुझा वाचक शब्द म्हणजे ओमकार. हेच ब्रह्म ! ओमकार सर्वत्र एकजिनसी आहे. श्रुतीने हेच सांगितले आहे. ॐ असा अध्ययनाला सुरुवात करणारा ब्राह्मण (ब्रह्म जाणे इती ब्राह्मण:) मला ब्रह्माची प्राप्ती होवो असे म्हणतो. त्याप्रमाणे त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. या वचनाप्रमाणे ॐ म्हणूनच अध्ययनास आरंभ करावा म्हणजे तेच प्रणवरूप गायत्रीचे व शब्द ब्रह्माचे स्मरण होईल. त्यानेच विघ्नाचे हरण होईल व ज्ञानप्राप्ती होईल.
अखिल चराचर सृष्टी म्हणजे ज्याचा चिद्विलास असा अनादी, गगनरूप सर्वेश्वर सद्धर्म स्थापण्याकरिता वेळोवेळी सगुण रुपात ठिकठिकाणी अवतार घेतो व धर्माचे खरे रहस्य प्रकट करून सांगतो.
कालांतराने जेव्हा मालिन्य उत्पन्न होते व धर्माचे खरे स्वरूप नष्ट होवून त्यांस विकृत स्वरूप प्राप्त होते. अशा वेळी थोर विभूती जन्मास येतात व धर्माचे अस्तित्व कायम राहते.
हल्ली धर्मास अवनत अवस्था प्राप्त झाली आहे असे म्हणण्यात येते. ह्याचे कारण धर्माचे खरे रहस्य सांगून ते प्रत्यक्ष पटवून देणा-या गुरूंचा अभाव हे होय. अशा परिस्थितीत जनसमूहात सार्वत्रिक अज्ञान पसरल्यास व तद्द्वारे त्याची अध्यात्मिक अधोगती होत असल्यास नवल नाही. याचा परिणाम मत वैचित्र्य, विपरीत भावना, भ्रम वगैरेमध्ये झालेला दृष्टोत्पत्तीस येतो. असे जरी असले तरी सर्वसामान्य व विशेषत: सुशिक्षित समजल्या जाणा-या वर्गामध्ये अध्यात्म शाश्त्राबद्दल व स्वरूपज्ञान प्राप्त करून घेण्याबद्दल जिज्ञासा आहे, असे आम्हांस आढळून आले आहे. उपरीनिर्दीष्ठ परिस्थितीमुळे अशा लोकांना एक भीती वाटत असते कि, आपण भलत्याच्या नादि लागून फसू कि काय? कोणीतरी भलत्या मार्गाला आपणास लावून विपरीत ज्ञानाच्या गर्तेत नेवून टाकील कि काय? व आत्मसाक्षात्कार होण्याऐवजी आपण जास्त-जास्त अधोगतीस जावू कि काय? हल्ली भौतिक शाश्त्रानुसार शास्त्रीय शोध दिवसानुदिवस जास्त प्रमाणात लागू लागले आहेत तस तशी विचारी लोकांत अध्यात्मज्ञानाबद्दल जिज्ञासाही वाढू लागली आहे. खरे धर्मरहस्य काय आहे? खरे ज्ञान म्हणजे काय? हे जाणून घेण्याची व ते बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर घासून पाहण्याची भावना उत्पन्न झाली आहे. तशी ती होणारच; कारण एक शोध लागला व तो चमत्कृतीजन्यसा वाटला कि ‘त्याच्यापुढे काय’ हे जाणण्याची पुन: जिज्ञासा होणे स्वाभाविक आहे. याप्रमाणे भौतिक शास्त्रीय ज्ञानाच्या वाढीबरोबर अशीही जिज्ञासा उद्भवणे साहजिक आहे कि, चर्म चक्षूंना अदृश्य व अगम्य, पण ज्ञानचक्षूंना गम्य असे स्वरूप तरी कसे आहे?
सद्गुरू – हि जिज्ञासा पुरी होण्यास सद्गुरू पाहिजेत असे आपले शास्त्र सांगते.
      वंदे गुरूंणा चरणारविन्दम / संदर्शितम् स्वात्मसुखावबोधं //
      जनस्य ये जान्गलीकायमाने / संसार हालाहलमोह्शांतै //
      सध्या शाब्दे परे च निष्णातं अशा सद्गुरुंचीच उणीव तीव्रतेने भासू लागली आहे. जनतेस खरे ज्ञान सांगून त्यांच्या बुद्धीस पटवून द्यावयास पाहिजे. ज्यांना ते पटले असेल अशांपैकी जे कोणी अभ्यास करून साक्षात्कार प्राप्त करून घेण्याच्या उद्योगास लागले असतील, त्यांच्या मार्गात येणा-या अडचणींना व लहानसहानसुध्दा येणा-या अनुभवांचा उमज व खुलासा करून देणारा व पुढील मार्ग दाखविणारा, असा ज्ञानी सत्पुरुष पाहिजे. जो स्वत: त्या मार्गावरून गेला असेल त्यासच त्यांतील सूक्ष्म भेद व ‘कोठे नडते’ ते कळेल. अशा सद्गुरूंची गांठ पडणे हे महत् भाग्य होय ! असे सद्गुरू भेटले तरी ते ओळखण्याची सामान्य माणसास पंचाईत पडते; कारण तोही माणसा सारखाच माणूस दिसतो. तो अगदी साधा दिसतो, पण त्याच्या सहवासाने त्याच्या ठिकाणचे विभूतीमत्व दृष्टोत्पत्तीस येते. सत्पुरुषांचा समागम मुद्दाम प्रयत्नपूर्वक करावा, त्यांची जरूर तर सेवा करावी, त्यांचे प्रेम संपादन करावे म्हणजे ते कृपाप्रसाद करतात. ते कृपा कशी व कोणत्या वेळी करतील हे कळूनही देणार नाहीत. त्यांच्या सहवासात वेदांत, अध्यात्म व अनुभव ज्ञान यांची चर्चा व साक्षात्कार यांशिवाय दुसरे काय प्राप्त होणार?
      सद्गुरुंस अनन्य भावाने शरण जणारास आत्मज्ञान करतलामलकवत् होते. त्यास परब्रह्माचा साक्षात्कार होतोच होतो.
      यस्य देवे परा भक्तीयर्था देवे तथा गुरौ //
      तस्यैते कथिता हृर्था: प्रकाशन्ते महात्मन: प्रकाशन्ते महात्मन: //             ...................................श्वेताश्वतरोपनिषत् ६:२२ 
      ज्याची देवाच्या ठिकाणी परमभक्ती आहे आणि जसा देवाच्या ठिकाणी अनन्य भाव आहे तसा गुरूच्या ठिकाणी ज्याचा अनन्य भाव आहे त्याला या महान आत्म्याच्या गोष्ठी सांगितल्या असता स्पष्टपणे कळतात. आत्मज्ञानाचा उपदेश केला असता साक्षात्कार होतो. द्विरुक्त्तीने तो होतोच असे निश्चयाने सांगितले आहे.
            वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !!
      परात्परतरम् ध्यायेत् ! नित्यमानंदकारकम् !!
      हृदयाकाशमध्यस्थम् ! शुद्धस्फटिकसंनिभम् !!
पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेन्द्रीये व मनबुद्धयादिक इत्यादिकांचा नियंता व प्रेरक आणि ज्याचे वास्तव्य मूलाधार चक्रावर मानले आहे अशा आत्मरूप बुद्धीदात्यास नमन असो ! त्याचप्रमाणे हंसावर आरूढ होणारी प्रणवरूपिणी वाग्देवता तिलाही वंदन असो !
निर्गुण, निराकार, परेच्या पलीकडील, सच्चिदानंदरूप अशा सहस्रदलकमळामध्ये स्थित असलेल्या प्रकाशरूप व परब्रह्मस्वरूपी सद्गुरू पदाचे ठिकाणी एकात्मभावाने लीन असो ! (संदर्भ षटचक्र दर्शन व भेदन)
अनुग्रह – पुष्कळ लोक कित्येकांकडून ‘उपदेश’ घेतात व कित्येक तो देतातही. कोणी कोणासही पाहिजे तो मंत्र सांगावा व गुरुशिष्याचे नाते जोडावे अशी परिस्थिती आहे. अशाने कोणाचेच कल्याण होणार नाही. सद्गुरू हे कोणालाही उपदेश घ्या असे कधीही सांगत नाही व सत् शिष्य ‘उपदेश द्याच’ असे कधीही म्हणत नाही. सद्गुरू सत् शिष्याचा अधिकार पाहून आपण होवूनच अनुग्रह करीत असतात.
‘उपदेश’ व ‘अनुग्रह’ यांत फरक आहे. सद्गुरू सत् शिष्यावर अनुग्रह करतात म्हणजे त्याच्या अंत:करणात शिरून त्याच्या बुद्धीतत्वास चालना देतात व त्याचा सर्व वृत्ती एकदम स्वस्वरूपी लीन करतात. त्यावेळी त्यास आत्मसाक्षात्कार होतो. यांस शक्तिपात असेही म्हणतात.
एक वेळ स्वस्वरूपदर्शनरूपी सिंहासनावर बसल्यावर मग तो उत्थान दशेत आला व लोकव्यवहार करू लागला तरी स्वरुपाची अखंड जाणीव त्यास राहते. पुढे दृढ अभ्यासाने तो ब्रह्मस्वरूपी लीन होतो. हा मार्ग आक्रमण्यास फार कठीण आहे. प्रारब्धकर्मानुसार अभ्यासात प्रतिबंध येतात, चित्तास विक्षेप उत्पन्न होतो व मन अस्थिर होते, पण सद्गुरूंची आर्त चित्ताने जो करून भाकतो त्यास कल्पवृक्षाप्रमाणे ते फलदायी होतात ! त्यांचे प्रेम कुर्मीप्रमाणे अलौकिक प्रेम असते. सद्गुरू शिष्याने करुणा भाकण्याची आवश्यकताहि ठेवीत नाहीत; तर ते आपण होवूनच अखंड प्रेम करीत असतात. सद्गुरूमातेची केवढी हि थोरवी !
सद्गुरू कोण ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
  साभार : संदर्भ : प्रनवोपासना.........श्री म वैद्य

रविवार, १ जानेवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग पहिला)

सतभक्तीचे स्वरूप (भाग पहिला)

हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गाप्रमाणे हा मार्ग नाही. हा अत्यंत साधा सोपा सरळ मार्ग आहे. पण दोन्ही टोके सांभाळायची.

आपण जाणताच हाताच्या बाजू दोन - एक उजवी अन दुसरी डावी. त्या दोन बाजूंमध्ये उजवा गट भक्ती अन डावा गट तामस, हटयोग, प्राणायाम. हि तामस लोकांची भक्ती आहे. तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी हि सर्व तामस लोकांची उपासना.

भक्तियुक्त उपासना कोणती - तर अखंड नाम.
त्या परते दुसरे काही नाही. जे सत् पदाने अखंड नाम सत्-पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे, त्याचेच नामस्मरण करणे आणि त्यांच्याच दर्शनात दर्शनयुक्त राहणे हेच त्याचे मर्म. अशा स्थितीत राहिले ते ऋषी-मुनी, ब्रह्मऋषी, सप्तर्षी आणि त्यांची गुरुकुले या चौकट मुनींच्या गुरुकुलातले, तर कोपिष्ट मुनींची गुरुकुले त्यात शुक्राचार्य, दुर्वास, विश्वामित्र अन त्यांची गुरुकुले, राक्षस, अघोर ज्यांना संजीवनी मिळाली होती, हि वेगळी चाकोरी आणि भक्ती हि वेगळी चाकोरी. तामसी वृत्तीच्या लोकांचा ताफा मोठा होता. यांच्या बाजूला भरपूर अघोर होते. परंतु ब्रह्मर्षी, सप्तर्षी, यांचा ताफा मात्र लहान होता. परंतु तेजस्वी होता. तेजोबालासहित होता. याचे कारण सत कोणाच्या बाजूला होते तर सात्विकांच्या. सत त्यांनाही (तामसी वृत्तीच्या लोकांनाही) सांगत असे कि मी तुमच्या बरोबर आहे. कारण दोन्ही प्रवृत्ती सत आणि तामस असलेले लोक हे त्यांचेच भक्त होते. दोन्हीही सताचेच भक्त. तामसी लोकांची विपरीत बुद्धी तर सात्विकांची सरळ बुद्धी.   

भक्ति – एक राजमार्ग !
म्हणजेच - भक्तीचा मार्ग साधा सरळ पण राजमार्ग. भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे, त्यात काटे, कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु, तामसी वृत्तीच्या मार्गात काटे, कुटे, खाच, खळगे, सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे. आता आपण जाणताच कि वेगवेगळी शुद्दीकरणे आपण पाहिली, अनुभवली. या शुद्दीकरणात आपणा सर्वांना हे कळून चुकले होते कि अघोरांकडे वेगवेगळे वरद्हस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतीना  शुद्दीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता.

परंतु शुद्दीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच घेणार परंतु अशी वेळ आली कि अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! शेवटी सत् बाजू कोणाची घेते तर सात्विकांचीच ! सत् सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही.

कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो कि सात्विक ज्योती देखील चिडतात, अघोर मातले आहे, त्यांचा आम्हाला त्रास होत आहे. आज तुम्ही पाहतच आहात, अनुभवत आहात, गेली तीस वर्षे आम्ही अघोरांचा नाश करीत आहोत. स्थूलातून गेलेल्या या अघोरांनी सुक्ष्माने मानवांवर कब्जा केला. द्वापार युगापासून जेवढे अघोर अवतारकार्यात मारले, ते सर्व अघोर सुक्ष्माने होते. सुक्ष्माने ते कार्य करीत होते. गेल्या पंचवीस अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थुलाने केला त्यांचा नाश सुक्ष्माने करणे तुम्हा मानवांना शक्य होईल का?

ज्यांच्यासाठी ॐ कारांना जन्म घ्यावा लागला, ज्यांच्याकरिता अनन्तानी ॐ करांना आदेश देवून जन्म घ्यावयाला भाग पाडले अन् त्यांना कर्तव्याची दिशा दिली. मग अशा अघोरांच्या सुक्ष्मांचा नाश तुम्ही कलियुगी मानव करू शकता का?

आपण पाहताच कि आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिति होत असतांना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य ८५० पाय-यांच्या अघोर ज्योतींचा देखील नाश केला गेला आहे. सर्वस्व ज्या राक्षसांकडे होते, ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र अशा देखील अघोरी ज्योतींचा या शुद्धीकरणातून नाश केला गेला आहे. पुढे चालू...........(२)