शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

नव वर्षाच्या सकल जणांना हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा ...........!!!
येते वर्ष आपणा सगळ्यांना सुख - समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्याचे आणि आनंदाचे जावो हीच त्या ईश्वर चरणी सदिच्छा .......!!!

मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

अजपा-जप-भाग २


आता महत्वाचा मुद्दा – अजपा-जप म्हणजे काय?
या सृष्टीमध्ये देहधारी जितका प्राणी आहे, त्या प्रत्येकाचे जीवित प्राणवायूवर अवलंबून आहे असे दिसून येईल. भूपृष्ठावर वावरणा-या प्राण्यांचे जीवित श्वासोच्छवासावर अवलंबून आहे. असे आपणास प्रत्यही आढळून येईल. जलामध्ये वावरणा-या जलचरांना प्राणवायू घेण्याकरिता ईश्वर निर्मित काही इंद्रिये असतात. भूगर्भामध्ये सापडणा-या प्राण्यान्नासुद्धा प्राणवायूची गरज लागते असे शास्त्रज्ञांचे विचारावरून दिसून येईल. यावरून असे ध्यानी येईल कि, जारज, स्वेदज, उद्भिज व अन्डजादि चारी खानिन्पैकी कोणत्याही खाणीत उत्पन्न झालेला प्राणी असो, त्यांस श्वासोच्छवासाची जरूरी असते.

श्री समर्थ रामदास म्हणतात,
देहधारक जितुका प्राणी / स्वेतजउद्भिजादीक खाणी //
श्वासोच्छवास नसता प्राणी / कैसे जिती // ..............दासबोध १७: ५: १२
ही श्वासोच्छवासाची क्रिया अखंड चालू असते व ह्याचे कमीजास्त प्रमाणावर, स्थैर्यावर व निरोधावर आयुष्याची मर्यादा अवलंबून असते. मनुष्य प्राण्यापूरताच आपणास विचार कर्तव्य असल्यामुळे मनुष्य प्राण्यांच्या दृष्टीनेच याचा विचार आपण करू.
पाश्च्यात्य शास्त्र्यज्ञ सुद्धा हे मानतात कि, मनुष्याने श्वासोच्छवासाचे प्रमाण नियमित केले तर मनुष्याचे आयुष्य खात्रीने वाढलेच पाहिजे. ह्याचाच अर्थ असा कि जर आपण आपला श्वास योग्य पद्धतीने सुरु ठेवला तर आपले सगळ्यांचे आयुष्य वाढण्यास मदतच होईल, इतकेच नव्हे तर ते खात्रीने वाढेलच.
श्वास नाकाने आत म्हणजेच फुफ्फुसामध्ये घेणे व तो बाहेर सोडणे या दोन्ही क्रियेस एक श्वासोच्छवास किंवा इंग्रजीमध्ये रेस्पिरेशन असे म्हणतात. वैद्यक शाश्त्राचे मते हे प्रमाण दर मिनिटांस सुमारे १८ असून अत्यंत श्रम केल्यावर, तसेच फुफ्फुसाचे विकारात किंवा भीतीमुळे मनावर परिणाम झाल्यामुळे ते वाढते. चित्ताचे समाधान असले म्हणजे हे प्रमाण कमी असते.
आपल्या शास्त्राने असे सांगितले आहे कि, प्रत्येक जीवाची आयुर्मर्यादा त्याच्या प्रारब्द्ध कर्मानुसार कमी जास्त वर्षांची ठरलेली असते. म्हणजेच त्याने जन्माला आल्यापासून ते मृत्त्युमुखी पडेपर्यंत ठराविक संख्येचे श्वासोच्छ्वास घेतले पाहिजेत अशी मुली विधीघटनाच दिसते. अहोरात्र म्हणजे चोवीस तासांमध्ये मनुष्याचे श्वासोच्छवास २१६०० वेळा होतात असे मानण्यात येते. या हिशेबाने पाहिल्यास एका तासामध्ये ९०० वेळा श्वासोच्छवास होताना दिसून येईल व म्हणूनच एका मिनिटांमध्ये तो १५ वेळा होताना दिसून येईल आणि गम्मत म्हणजे हे प्रमाण वैद्यक शास्त्राशी मिळते जुळते आहे हे ध्यानी येईल.
हि जी श्वास घेण्याची व सोडण्याची म्हणजे उच्छ्-वासाची क्रिया आहे, यामध्ये सहजासहजी एक जप होतो असे वेदांत शास्त्राचे व आगमाचे मत आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही देवतेचे अगर मंत्रांचे जप मुद्दाम जपावे लागतात, त्याप्रमाणे हा अजपा-जप मुद्दाम जपण्याचे कारण पडत नाही; तर हा आपोआपच सहजासहजी न जपताच होत असतो म्हणूनच ह्यांस अजपा-जप असे म्हटले जाते.

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

भाग १ - अ-जपा जपाबद्दलची माहिती

यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसा सह /
यन्मौनम योगीभिर्गम्यम् तद्भजेत्सर्वदा बुध: //  .........श्रीमत् शंकराचार्य
अ-जपा जपाबद्दलची माहिती क्वचितच कांही लोकांना असेल. ‘हे मोठे रहस्य आहे’ असे कित्येकांना वाटते तर ‘हा विशिष्ट जप आहे व तो साम्प्रदायिक आहे’ अशी कित्येकांची भावना आहे. ‘हे काहणी गौडबंगाल आहे व ते कळणे शक्य नाही’ अशीही कित्येकांची समजूत आहे. कोणत्या ना कोणत्या सकारण अगर अकारण, निमित्ताने हा विषय गुढ होवून बसला आहे. हा विषय फार महत्वाचा आहे. प्रत्येक जीवाशी याचा संबंध आहे. ह्याचे यथातथ्य ज्ञान प्राप्त करून घेतले असता मनोलय व प्राणलय सहज साध्य करून घेता येवून अंती स्वस्वरूप साक्षात्कार प्राप्त करून घेता येतो ! सर्व सत्पुरुषांनी याचे फार महत्व वर्णन केले आहे व या विषयावर उहापोह केला आहे. समर्थ श्री रामदास स्वामी यांनी आपले दासबोधात एक स्वतंत्र समास यास दिला आहे. (संदर्भ : दशक १७ समास ५) कित्येकांची अशी समजूत आहे कि, हा हटयोगाचा विषय आहे. तेंव्हा या विषयात सामान्य जनाने पडण्यात अर्थ नाही. पण हा गैरसमज आहे. हटयोगात याचे वर्णन आढळून येते तसे राजयोगातही याचे वर्णन केलेले दृष्टोत्पत्तीस तरी याबद्दल कोणी गैरसमज करून घेवू नये. या विषयाकडे जिज्ञासू दृष्टीने पहिले म्हणजे हा विषय सर्वांना सहज कळण्याजोगा आहे. हा कळून घेवून त्याप्रमाणे नित्य अभ्यास करीत गेल्यास यांतील रहस्य प्रत्यक्ष अनुभवास येत जाईल ! उपासना या दृष्टीनेहि याचे फार महत्व आहे.
हा जप आहे. जप म्हटला कि तंत्र विधी आहे व मंत्र आहे. या जपाच्या ध्यानाचे श्लोकात सर्व रहस्य साठवलेले आहे व याचे वर्णनही त्यांत आहे. हा जप कठीण आहे. तो म्हणतांना व एकापासून दुस-याकडे जाताना पाठभेद कित्येक वेळी अनर्थकारक होतात. तेंव्हा जप सशास्त्र व शुद्ध होईल हे पहावे.
पुढे  चालू ..............श्री श्री म द वैद्य लिखित - षटचक्र दर्शन व भेदन ........मधून साभार .....

रविवार, २५ डिसेंबर, २०११

सद्गुरूंचे लक्षण

मुख्य सद्गुरूंचे लक्षण / आधी पाहिजे विमल ज्ञान /
निश्चयाचे समाधान / स्वरूपस्थिती //
म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन / स्वधर्म कर्म आणि साधन /
कथा निरुपण श्रवन मनन / नीती न्याय मर्यादा //
..................................................समर्थ ग्रंथराज //

हे प्रभो.......!!!

हे निर्गुण निरंजन नित्यपूर्ण स्वरूपा ! हे त्रिगुनातीत सच्चीदानंदा प्रभो ! तुज एकात्मभावाने नमन असो !! प्रकाशरूप परमात्मस्वरूपी होऊन ब्रह्मांडाचा तू उत्पत्ति-स्थिती-लयकर्ता व प्रेरक होतोस. हृदयाकाशात सूक्ष्म कण प्रकाशमयरुपात असून मन बुध्यादिकान्स प्रेरणा करतोस. तुझ्याच प्रेरणेने स्वस्वरूपप्राप्ती होण्याकरिता लिहिल्या गेलेल्या ग्रंथाचे कर्तृत्व लेखकाकडे नसून तुझ्याकडेच येते म्हणून तुझेच स्मरण करून तुझ्या ठिकाणी लीन होवू.