सोमवार, २६ डिसेंबर, २०११

भाग १ - अ-जपा जपाबद्दलची माहिती

यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसा सह /
यन्मौनम योगीभिर्गम्यम् तद्भजेत्सर्वदा बुध: //  .........श्रीमत् शंकराचार्य
अ-जपा जपाबद्दलची माहिती क्वचितच कांही लोकांना असेल. ‘हे मोठे रहस्य आहे’ असे कित्येकांना वाटते तर ‘हा विशिष्ट जप आहे व तो साम्प्रदायिक आहे’ अशी कित्येकांची भावना आहे. ‘हे काहणी गौडबंगाल आहे व ते कळणे शक्य नाही’ अशीही कित्येकांची समजूत आहे. कोणत्या ना कोणत्या सकारण अगर अकारण, निमित्ताने हा विषय गुढ होवून बसला आहे. हा विषय फार महत्वाचा आहे. प्रत्येक जीवाशी याचा संबंध आहे. ह्याचे यथातथ्य ज्ञान प्राप्त करून घेतले असता मनोलय व प्राणलय सहज साध्य करून घेता येवून अंती स्वस्वरूप साक्षात्कार प्राप्त करून घेता येतो ! सर्व सत्पुरुषांनी याचे फार महत्व वर्णन केले आहे व या विषयावर उहापोह केला आहे. समर्थ श्री रामदास स्वामी यांनी आपले दासबोधात एक स्वतंत्र समास यास दिला आहे. (संदर्भ : दशक १७ समास ५) कित्येकांची अशी समजूत आहे कि, हा हटयोगाचा विषय आहे. तेंव्हा या विषयात सामान्य जनाने पडण्यात अर्थ नाही. पण हा गैरसमज आहे. हटयोगात याचे वर्णन आढळून येते तसे राजयोगातही याचे वर्णन केलेले दृष्टोत्पत्तीस तरी याबद्दल कोणी गैरसमज करून घेवू नये. या विषयाकडे जिज्ञासू दृष्टीने पहिले म्हणजे हा विषय सर्वांना सहज कळण्याजोगा आहे. हा कळून घेवून त्याप्रमाणे नित्य अभ्यास करीत गेल्यास यांतील रहस्य प्रत्यक्ष अनुभवास येत जाईल ! उपासना या दृष्टीनेहि याचे फार महत्व आहे.
हा जप आहे. जप म्हटला कि तंत्र विधी आहे व मंत्र आहे. या जपाच्या ध्यानाचे श्लोकात सर्व रहस्य साठवलेले आहे व याचे वर्णनही त्यांत आहे. हा जप कठीण आहे. तो म्हणतांना व एकापासून दुस-याकडे जाताना पाठभेद कित्येक वेळी अनर्थकारक होतात. तेंव्हा जप सशास्त्र व शुद्ध होईल हे पहावे.
पुढे  चालू ..............श्री श्री म द वैद्य लिखित - षटचक्र दर्शन व भेदन ........मधून साभार .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: