मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

अजपा-जप-भाग २


आता महत्वाचा मुद्दा – अजपा-जप म्हणजे काय?
या सृष्टीमध्ये देहधारी जितका प्राणी आहे, त्या प्रत्येकाचे जीवित प्राणवायूवर अवलंबून आहे असे दिसून येईल. भूपृष्ठावर वावरणा-या प्राण्यांचे जीवित श्वासोच्छवासावर अवलंबून आहे. असे आपणास प्रत्यही आढळून येईल. जलामध्ये वावरणा-या जलचरांना प्राणवायू घेण्याकरिता ईश्वर निर्मित काही इंद्रिये असतात. भूगर्भामध्ये सापडणा-या प्राण्यान्नासुद्धा प्राणवायूची गरज लागते असे शास्त्रज्ञांचे विचारावरून दिसून येईल. यावरून असे ध्यानी येईल कि, जारज, स्वेदज, उद्भिज व अन्डजादि चारी खानिन्पैकी कोणत्याही खाणीत उत्पन्न झालेला प्राणी असो, त्यांस श्वासोच्छवासाची जरूरी असते.

श्री समर्थ रामदास म्हणतात,
देहधारक जितुका प्राणी / स्वेतजउद्भिजादीक खाणी //
श्वासोच्छवास नसता प्राणी / कैसे जिती // ..............दासबोध १७: ५: १२
ही श्वासोच्छवासाची क्रिया अखंड चालू असते व ह्याचे कमीजास्त प्रमाणावर, स्थैर्यावर व निरोधावर आयुष्याची मर्यादा अवलंबून असते. मनुष्य प्राण्यापूरताच आपणास विचार कर्तव्य असल्यामुळे मनुष्य प्राण्यांच्या दृष्टीनेच याचा विचार आपण करू.
पाश्च्यात्य शास्त्र्यज्ञ सुद्धा हे मानतात कि, मनुष्याने श्वासोच्छवासाचे प्रमाण नियमित केले तर मनुष्याचे आयुष्य खात्रीने वाढलेच पाहिजे. ह्याचाच अर्थ असा कि जर आपण आपला श्वास योग्य पद्धतीने सुरु ठेवला तर आपले सगळ्यांचे आयुष्य वाढण्यास मदतच होईल, इतकेच नव्हे तर ते खात्रीने वाढेलच.
श्वास नाकाने आत म्हणजेच फुफ्फुसामध्ये घेणे व तो बाहेर सोडणे या दोन्ही क्रियेस एक श्वासोच्छवास किंवा इंग्रजीमध्ये रेस्पिरेशन असे म्हणतात. वैद्यक शाश्त्राचे मते हे प्रमाण दर मिनिटांस सुमारे १८ असून अत्यंत श्रम केल्यावर, तसेच फुफ्फुसाचे विकारात किंवा भीतीमुळे मनावर परिणाम झाल्यामुळे ते वाढते. चित्ताचे समाधान असले म्हणजे हे प्रमाण कमी असते.
आपल्या शास्त्राने असे सांगितले आहे कि, प्रत्येक जीवाची आयुर्मर्यादा त्याच्या प्रारब्द्ध कर्मानुसार कमी जास्त वर्षांची ठरलेली असते. म्हणजेच त्याने जन्माला आल्यापासून ते मृत्त्युमुखी पडेपर्यंत ठराविक संख्येचे श्वासोच्छ्वास घेतले पाहिजेत अशी मुली विधीघटनाच दिसते. अहोरात्र म्हणजे चोवीस तासांमध्ये मनुष्याचे श्वासोच्छवास २१६०० वेळा होतात असे मानण्यात येते. या हिशेबाने पाहिल्यास एका तासामध्ये ९०० वेळा श्वासोच्छवास होताना दिसून येईल व म्हणूनच एका मिनिटांमध्ये तो १५ वेळा होताना दिसून येईल आणि गम्मत म्हणजे हे प्रमाण वैद्यक शास्त्राशी मिळते जुळते आहे हे ध्यानी येईल.
हि जी श्वास घेण्याची व सोडण्याची म्हणजे उच्छ्-वासाची क्रिया आहे, यामध्ये सहजासहजी एक जप होतो असे वेदांत शास्त्राचे व आगमाचे मत आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही देवतेचे अगर मंत्रांचे जप मुद्दाम जपावे लागतात, त्याप्रमाणे हा अजपा-जप मुद्दाम जपण्याचे कारण पडत नाही; तर हा आपोआपच सहजासहजी न जपताच होत असतो म्हणूनच ह्यांस अजपा-जप असे म्हटले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: