शुक्रवार, २ मार्च, २०१२

अजपा-जप ......भाग तिसरा.....!!!

सो ऽ हम् :
हा जो अनायासाने सहजासहजी जप होत असतो यांत कोणता मंत्र जपला जातो हे आपण पाहू. एकांतामध्ये स्वस्थ चित्ताने बसावे व श्वासोच्छवासावर लक्ष ठेवावे म्हणजे श्वासोच्छवासाचे वेळी सो ऽ हम् सो ऽ हम् असे शब्द उमटतात असे प्रत्यक्ष अनुभवास येईल. श्वास आत घेताना ‘सो’ व बाहेर सोडताना ‘हं’ अशा त-हेने सोहंचा हा अखंड जप सुरु असल्याचे ध्यानी येईल.
श्री समर्थ म्हणतात –
एकांती मौन धरून बैसे / सावध पाहाता कैसे भासे / सोहं सोहं ऐसे / शब्द होती //
ऐसी हे अ-जपा सकळासी / परंतु कळे जाणत्यासी / सहज सांडून सायासी / पडोच नये //
आपण जागृत अवस्थेत अगर स्वप्नावस्थेत असलो किंवा गाढ निद्रेतही असलो तरी हा जप आपल्यास नकळत पाण्याचे प्रवाहाप्रमाणे एकसारखा सोहं, सोहं, सोहं असा सुरुच आहे ! या अखंड जपात सोऽहम् असा जप होत असतो. या मंत्राचे अक्षराकडे पाहिले म्हणजे कळून येईल कि, स: व अहं अशी दोन पदे यामध्ये आहेत. यांचा अर्थ असा कि तो मी (आहे), वेदांत शास्त्राचे दृष्टीने याचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ निरनिराळा आहे.
वाच्यार्थ असा कि, अज्ञानाच्या उपाधीमध्ये – अविद्येमध्ये – गुरफटलेले आहे असे भासणारे चैतन्य, म्हणजे अर्थात अहं विशिष्ट बिंदुमात्र जीव, हा मायोपाधिक सर्व जगावर सत्ता चालविणारा ईश्वर आहे. हा अर्थ घेतला म्हणजे या मंत्रात जीवा शिवाचे ऐक्य दर्शविले आहे असे दिसून येईल!  
लक्षार्थाने विचार केला तर असे कळून येईल कि, आपले स्वस्वरूप जो अंगुष्टमात्र आत्मा, तो अखिलव्यापी प्रकाशरूप परमात्मा आहे. या दृष्टीने आत्म्याचे व परमात्म्याचे यांत ऐक्य दर्शविले आहे असे ध्यानी येईल ! या जपाचे सकार हे शक्तीबीज आहे व हकार हे पुरुष बीज मानिले आहे असे समजावे. सकार बीज नामरुपात्मक दृश्य जडाचा उद्भव व लय कळून येतो ! या जपासम्बधी कित्येकांनी असे सांगितले आहे कि, श्वास आत घेताना स: म्हणजे तो ईश्वर मी आहे अशी वृत्ती स्वासाबरोबर आत घ्यावी व श्वास बाहेर सोडताना अहं म्हणजे मी ही अहंकार वृत्ती बाहेर सोडावी. अशा त-हेने देहाच्या अहंकाराचा त्याग करीत जावे व ईश्वर वृत्ती सतत आत साठवीत जावी म्हणजे कालांतराने आपणच सर्वव्यापी ईश्वर आहोत असा साक्षात्कार होईल ! याचा अनुभव अभ्यासाशिवाय मिळणार नाही. हे सहज शब्द आहेत. ही सहज उपासना आहे.
समर्थ म्हणतात –
उच्चारेवीण जे शब्द / ते जाणावे सहज शब्द /
प्रत्यया येती परंतु नाद / काहींच नाही //
ते शब्द सांडूनी बैसला / तो मौनी म्हणावा भला //
हा जप सर्व प्राणीमात्र करतात. परंतु तो फक्त जाणत्यासच कळतो व त्याचे रहस्य त्यास कळते. या सहज जपाचे रहस्य कळून घेतल्यानंतर इतर कोणत्याही मंत्रजपाचे सायासात पडण्याचे कारण नाही. इतर जप हे मुद्दाम उच्चार करून करावे लागतात त्यामुळे नाशिवंत आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ दगड उत्तम घडविला व मोठ्या सायासाने त्याचा जरी देव बनविला तरी तो केव्हाना केव्हा भंग पावणारच. देव मात्र सर्वव्यापी व सहज आहे. अशा स्थितीत सहज असणा-या देवावर विश्वास ठेवण्याऐवजी नाशिवंत दगडावर कोण विश्वास ठेवील? त्याचप्रमाणे या सहज अ-जपा-जपावर भावना ठेवली म्हणजे सहज देवाची उपासना आपोआपच होते, सहज जप होतो, ध्यान घडते, स्तुति होते व ईशस्तवन होते. अशा त-हेने जी सहज सेवा होते तीच सर्वव्यापी ईश्वरास प्रिय होते. म्हणून याच जपाचे रहस्य समजून घेणे व त्याचा अनुभव घेणे हे श्रेष्ठ कर्तव्य होय ! आपल्या देहरूपी घरांत सुरु असणा-या या ज्ञानभांडाराचे जर आपण ज्ञान करून घेतले नाही तर निद्रेवी पुरुषाप्रमाणे स्थिति होते. निद्रेव्यास द्रव्याचा साठा तळघरांत असला तरी सापडत नाही म्हणून तो दरिद्री राहतो. खाली लक्ष्मी राहते व वर हा दरिद्री वावरतो अशी स्थिति होते ! तळघरांत द्रव्याचा साठा, भिंत्तीत द्रव्याचा साठा, खांबात व तुळवटांतही द्रव्याचा साठा ! अशाप्रकारे सभोवार द्रव्य असून आपण मध्ये कोरडा तो कोरडाच राहतो ! अशा परिस्थितीत जो करांत असतो त्यास अधिक दारिद्र्य येते. ईश्वराची ही काय अगाध करणी ? कित्येक द्रव्य पाहतात तर कित्येक त्याचा उपयोग करतात. हीच प्रवृत्ति व निवृत्ति होय ! म्हणून या सर्व गोष्ठी लक्षात घेवून अंतरीच्या नारायणाची ओळख करून घ्यावी.
     या मंत्र जपास मालेचे कारण नाही व मोजदादिचेही कारण नाही. ईश्वरानेच प्रत्येक दिवशी २१६०० इतका हा जप होतो असे अगोदरच ठरवून टाकले आहे. आपण जर काय करावयाचे असेल तर ते एवढेच की, या जापाकडे अनुसंधान वृत्ति ठेवावयाची. सकाम कर्म चित्तशुद्धीस कारण असते. चित्तशुद्धीकरता म्हणून का होईना या सहजासहजी होणा-या मंत्रजपाचे फळ, प्रत्येक स्त्री-पुरुषाने आम्ही वर उध्दृत्त केलेल्या शास्त्रोक्त जपविधीचे, दररोज प्रात:काळी सूर्योदयाबरोबर उदक सोडून पदरात का पडून घेऊ नये?
सौजन्य: षटचक्र दर्शन .......लेखक: श्री म वैद्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: