मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?


सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
सध्या जनतेमध्ये शारीरिक व मानसिक दौर्बल्याबरोबर आत्मिक बलाचाही –हास होत आहे, असे दृष्टोत्पत्तीस येते. यावर उपाय काय?
समाजात एकी उत्पन्न होऊन त्याची सामाजिक, आर्थिक व अन्य त-हेने उन्नतावस्था होणे अत्यंत जरूर आहे; पण त्याचबरोबर पूर्वकालीन द्विजांमध्ये व हल्लीही काही विभूतींमध्ये वसत असलेले सद्गुण म्हणजे शांत वृत्ति, तेजस्विता, त्यागवृत्ति व समाधान; तसेच कर्तुंमकर्तम् शक्ति आदिकरून गुणांचा प्रकाश कसा होईल इकडेही लक्ष दिले पाहिजे.
समाज हल्ली त्रिविध तापाने पोळला आहे व त्याची अंतर्मुख दृष्टी होऊ लागली आहे तेव्हा उपरिनिर्दिष्ट गुणांचा अभाव होऊन ही अधोगती का झाली याचा खोलवर विचार करणे जरूर आहे. इतिहासाकडे पहिले तर असे दिसून येईल की, द्विजानी परिस्थितीप्रमाणे आपद्धर्म म्हणून पुष्कळ वृत्ति स्वीकारल्या व वैशिष्ट्य कायम ठेवून हिंदुधर्म राखण्याचा प्रयत्न केला; परंतु आपद्धर्माची मर्यादा सध्या येथपर्यंत गेली आहे की, द्विजांनी – विशेषत: ब्राह्मणांनी – जवळजवळ आपले सर्व आचार व कर्मे सोडली, असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच आध्यात्मिक शक्ति वाढविण्याचे त्यांना नेमून दिलेले जें ज्ञान व उपसानादि मार्ग, तेही त्यांनी अजिबात सोडले. सध्याच्या परिस्थितीत आचार यथासांग होत नाहीत, अशी तक्रार ऐकू येते.  परिस्थितीनुरूप करणारास ते कठीण आहेत असेही नाही; किंवा सर्वतोपरी शक्य नाहीत असेही नाहीत, तरी मानसिक उन्नती करून घेणे व तद्द्वारा आध्यात्मिक तेजस्विता वाढविणे ही गोष्ट सर्वांस साध्य आहे आणि तशी ती सध्याच्या काळी वाढविणे अत्यंत जरूर आहे.
हल्ली बुद्धीप्रामाण्यास फार महत्व देण्यात येते. सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे प्रत्येकाने वागावे, असे सांगितले जाते. पण ही सद्सद्विवेकबुद्धी कोणती? याची मात्र कल्पना बहुतेकांस नसते.
हल्ली, सद्सद्विवेकबुद्धीचा अर्थ – मनास रुचेल व वाटेल ते असा घेतला जातो. परंतु हे चुकीचे आहे. याचा खरा अर्थ असा की, सत् म्हणजे परब्रह्म वस्तू व असत् म्हणजे मायिक सर्व क्षर सृष्टी या दोघांचा विवेक म्हणजे सत् कोणते व असत् कोणते त्याचा विचार करून सद्वस्तुचे ग्रहण करून असद्वस्तूचा त्याग करणे होय. अशी जी बुद्धी ति सद्सद्विवेकबुद्धी होय.
सद्सद्विवेकबुद्धीने खरोखरीच सर्वानी वागावयास हवे. अशा बुद्धीच्या विचाराने वागले म्हणजे अविद्येचा नाश होऊन आत्मत्वाचे ज्ञान होते व त्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. विद्येच्या योगाने प्राप्त झालेल्या या सामर्थ्यामुळे अमृतत्व मिळते, असे केनोपनिषदात सांगितलेले आहे; म्हणून द्विजांनी आपल्या वेदांनी जी उपासना सांगितली आहे, तीच करावयास हवी व त्यातच त्यांचे आत्यंतिक कल्याण आहे.
ब्राह्मण – ब्रह्म जाणे इति ब्राह्मण:, ज्याला ब्रह्माचे ज्ञान झालेले आहे असा तो मग कोणीही असो, तोच खरा ब्राह्मण होय. प्रणवोपासना या ग्रंथात लेखकाने दिलेल्या टीपेनुसार ‘ब्राह्मण’ हा शब्द ब्रह्म जाणण्याची इच्छा करणार या अर्थी व ज्याला गायत्रीची उपासना करण्याचा अधिकार आहे असा या अर्थी वापरण्यात आला आहे असे म्हटले आहे. (पृष्ठ : २१)   
ज्ञानवान जें ब्राह्मण होते त्यांनी आपली उपासना दृढ करून व सतत अभ्यासाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. प्रणवरूप जी गायत्री तिचेच अखंड ध्यान करून तिचे ज्ञान प्राप्त करून घेतले. व्यक्त ओंकार व अव्यक्त ओंकार यांचा साक्षात्कार ते मात्रालयाभ्यासाने करून घेत व अखंड ब्रह्मानंदात निमग्न होत ! अशी ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, अर्धमात्रात्मक प्रणवसंवितीची उपासना सोडून भलत्याच मार्गाने जाणे म्हणजे अधोगति प्राप्त करून घेणे होय. ब्रह्मा, विष्णु व महेश ज्या आदितत्वाची उपासना करतात अशी सर्वश्रेष्ठ उपासना सोडणे म्हणजे मूळ सोडून शेंडा धरण्यासारखेच होय. 
प्रणवोपासना ही सर्व सांप्रदायिक उपासनांची जननी आहे. या उपासनेचे प्रयोजन म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधून निरंजनस्वरूपी लीन होणे, हे होय. अविद्यादि बीजांचा समूळ नाश होऊन ब्रह्मसाक्षात्कार होणे व निरतिशयानंद सुखप्राप्ति होणे, हे याचे फल आहे आणि दृढ अभ्यास हे साधन आहे व ब्रह्मसाक्षात्कार हे साध्य आहे.
ज्ञानमार्गात ‘गुप्त’ असे काही नाही. थोर सत्पुरुषांनी व साधुसंतांनी आपले अनुभव ग्रंथरुपाने स्पष्टपाने जगापुढे ठेवले आहेत. ज्ञान स्वयंप्रकाशरूप आहे.  
सौजन्य: प्रणवोपासना .............श्री म वैद्य  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: