सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

अमृतवाणी


हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। 

गुरुदेव पितामह म्हणतात, "स्थुलाला त्रास होऊ लागल्यानंतर मानव सताचे चिंतन करतो." 


मानवाने असे का बरे करावे? उत्तर सोपे आहे. कारण मानव त्याच्या स्थुलाला म्हणजेच त्याच्या देहाला त्रास होवू लागल्यामुळे, त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सताला आठवतो, सताची मनधरणी करतो, सताला विनवणी करतो. त्याचे मन त्या अडचणीच्या प्रसंगी बरोबर, सताची, काकुळतीला येऊन त्या प्रसंगातून सोडविण्याची मागणी मागत असते. अर्थातच मानव सता पुढे साष्टांग लोटांगण घालून विनवणी करीतो की 

सता! मला या त्रासातून सोडवा आणि त्याला शंभर टक्केच काय, तर एकशे एक टक्के खात्री असते की माझे सतच मला यातून सोडवू शकतील.


याच्या विपरीत, "मानवाचे स्थुल आनंदीमय स्थितीने जेव्हा असते, त्यावेळेस मात्र मानव सताला न स्मरता आपल्या मायेच्या कर्तव्यात मशगुल असतो. सताला तो विसरतो. ही मानवी तऱ्हाच अशी आहे. अशावेळी त्याला सताची आठवण न होता आपल्या मायेची, मायेच्या माणसांची स्थिती करावीशी वाटते." आणि येथेच मायावी मानव फसतो. 


सुख असो, दुःख असो किंवा एखादा प्रसंग आपल्यावर आलेला असो, मानवाने सदोदित आपल्या सताची, आपल्या सद्गुरूंची आठवण ठेवावयास हवी. त्यांच्या नामस्मरणात राहावयास हवे, त्यांच्या चिंतनात रमावयास हवे. ज्याच्यामुळे आपल्यावर त्यांचा कृपाहस्त, त्यांचा आशीर्वाद, त्यांचे सर्वांगीण संरक्षण, त्यांचे लक्ष राहिल्याने कठीणातल्या कठीण प्रसंगातूनही ते आपल्याला सोडवतात व आपल्या जवळ घेतात.


म्हणुनच तुकाराम महाराज म्हणतात,

       हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

           विसर न व्हावा ।। तुझा विसर न व्हावा।।

        गुण गाईन आवडी। हेंचि माझी सर्व जोडी।।

            माझी सर्व जोडी।। हेंचि माझी सर्व जोडी।।

        न लगे मुक्ती आणि संपदा। संत संग देई सदा।।

 ...................................................................

 .............अनगड..........

            


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: