शनिवार, ७ जानेवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग दुसरा)


ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, आंधळ्याशी जग सारेची आंधळे !

जरी स्थूलात वा स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरांनी मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही?

अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे. काय मिळवावयाचे आहे? हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता - तर भक्तिमार्ग ! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे, तर भक्तिने ! आपल्याला काटयाकुटयातून जायचे नाही. गिरिकंदरातून जायचे नाही. दगड खड्ड्यातून जायचे नाही. फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपल्या इप्सित ठिकाणी पोहचणार.

अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशही सतानेच केला, करणार आहे याबद्दल शंका नाही. एवढी पंचवीस अवतार कार्ये झाली पण ॐ काराचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला ना? भक्तिचा नाश झाला नाही तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ति, अहंकारी भक्ति, दुष्ट बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर, द्वेष याचा नाश झाला.

आपल्याला माहीतच आहे, कोपिष्ट विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्याबरोबर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिष्ट संयमी, शांत अन् ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत. कधी कधी आम्ही चिडतो, परंतु ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन् त्यांनीही ते मान्य केले. ते सांगतात, सता ! आम्ही त्या युगात पाळले परंतु आता मीही पाळणार नाही. ते कसे दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्या पुढे सर्वजन लीन असतात. ब्रह्मर्षी पद काय आहे त्याची सेवेक-यांनो तुम्हाला कल्पना नाही.  साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन् त्यांच्या शक्तीही त्या ब्रह्मर्षी पदासमोर नतमस्तक असतात. यावरून आपण जाणले पाहिजे कि मानवात असून देखील त्यांची योग्यता किती श्रेष्ठ होती. असे ते गुरुदेव पितामह ! अन् त्यांचे पद मिळवायला कोपिष्ट यातायात करीत होता. त्याकरिता तो गुरुकुलांचा नाश करायला निघाला होता. गुरुकुलातील योगी, योगिनींचा छळ करायला निघाला.

ब्रह्मर्षी पद !!!
ब्रह्मर्षी पद हे भक्तीचे पद ! अनन्तानी बहाल केलेले पद ! ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक आहे ते ब्रह्म. अन् अशा गुरुदेवांची बरोबरी हा कोपिष्ट करू इच्छित होता. खरोखर कोपिष्ट अन् गुरुदेवांची बरोबरी होवू शकेल का? अघोरांनी कितीही सिद्धी मिळविली असेल, कितीही वनस्पती जमा केलेली असेल, तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी अघोरांजवळ कितीही असो, तरीदेखील भक्तीच्या पुढे हे सर्व थिटे आहेत. भक्तीच्या पुढे त्यांचे काही चालत नाही. चालणार नाही.

भक्ति म्हणजे काय?
भक्ति म्हणजे काय तर एकच – नामस्मरण ! अन् सद्गुरू ध्यान ! जे अखंड नाम बहाल करतात ते आणि ज्यांची तुम्ही पूजा करत या दोघांचे समीकरण झाले म्हणजे तीच भक्ति होय. हि भक्ति इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे कि त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र या बरोबर तुम्ही करू शकत नाही. इतर शक्तीपेक्षा आपली भक्ति कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त गतीने जर मानव गेला तर त्याचे विवरण इतर शक्ती करू शकत नाहीत.                पुढे चालू...........(३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: