मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

सद्गुरू संबंधी विवेचन........!!!

Google Groups
Sadguru Darbar


हे निर्गुण निरंजन नित्यपूर्ण स्वरूपा ! हे त्रिगुनातीत सच्चीदानंदा प्रभो ! तुज एकात्मभावाने नमन असो !! प्रकाशरूप परमात्मस्वरूपी होऊन ब्रह्मांडाचा तू उत्पत्ति-स्थिती-लयकर्ता व प्रेरक होतोस. हृदयाकाशात सूक्ष्म कण प्रकाशमयरुपात असून मन बुध्यादिकान्स प्रेरणा करतोस. तुझ्याच प्रेरणेने स्वस्वरूपप्राप्ती होण्याकरिता लिहिल्या गेलेल्या ग्रंथाचे कर्तृत्व लेखकाकडे नसून तुझ्याकडेच येते म्हणून तुझेच स्मरण करून तुझ्या ठिकाणी लीन होवू.
तुझा वाचक शब्द म्हणजे ओमकार. हेच ब्रह्म ! ओमकार सर्वत्र एकजिनसी आहे. श्रुतीने हेच सांगितले आहे. ॐ असा अध्ययनाला सुरुवात करणारा ब्राह्मण (ब्रह्म जाणे इती ब्राह्मण:) मला ब्रह्माची प्राप्ती होवो असे म्हणतो. त्याप्रमाणे त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. या वचनाप्रमाणे ॐ म्हणूनच अध्ययनास आरंभ करावा म्हणजे तेच प्रणवरूप गायत्रीचे व शब्द ब्रह्माचे स्मरण होईल. त्यानेच विघ्नाचे हरण होईल व ज्ञानप्राप्ती होईल.
अखिल चराचर सृष्टी म्हणजे ज्याचा चिद्विलास असा अनादी, गगनरूप सर्वेश्वर सद्धर्म स्थापण्याकरिता वेळोवेळी सगुण रुपात ठिकठिकाणी अवतार घेतो व धर्माचे खरे रहस्य प्रकट करून सांगतो.
कालांतराने जेव्हा मालिन्य उत्पन्न होते व धर्माचे खरे स्वरूप नष्ट होवून त्यांस विकृत स्वरूप प्राप्त होते. अशा वेळी थोर विभूती जन्मास येतात व धर्माचे अस्तित्व कायम राहते.
हल्ली धर्मास अवनत अवस्था प्राप्त झाली आहे असे म्हणण्यात येते. ह्याचे कारण धर्माचे खरे रहस्य सांगून ते प्रत्यक्ष पटवून देणा-या गुरूंचा अभाव हे होय. अशा परिस्थितीत जनसमूहात सार्वत्रिक अज्ञान पसरल्यास व तद्द्वारे त्याची अध्यात्मिक अधोगती होत असल्यास नवल नाही. याचा परिणाम मत वैचित्र्य, विपरीत भावना, भ्रम वगैरेमध्ये झालेला दृष्टोत्पत्तीस येतो. असे जरी असले तरी सर्वसामान्य व विशेषत: सुशिक्षित समजल्या जाणा-या वर्गामध्ये अध्यात्म शाश्त्राबद्दल व स्वरूपज्ञान प्राप्त करून घेण्याबद्दल जिज्ञासा आहे, असे आम्हांस आढळून आले आहे. उपरीनिर्दीष्ठ परिस्थितीमुळे अशा लोकांना एक भीती वाटत असते कि, आपण भलत्याच्या नादि लागून फसू कि काय? कोणीतरी भलत्या मार्गाला आपणास लावून विपरीत ज्ञानाच्या गर्तेत नेवून टाकील कि काय? व आत्मसाक्षात्कार होण्याऐवजी आपण जास्त-जास्त अधोगतीस जावू कि काय? हल्ली भौतिक शाश्त्रानुसार शास्त्रीय शोध दिवसानुदिवस जास्त प्रमाणात लागू लागले आहेत तस तशी विचारी लोकांत अध्यात्मज्ञानाबद्दल जिज्ञासाही वाढू लागली आहे. खरे धर्मरहस्य काय आहे? खरे ज्ञान म्हणजे काय? हे जाणून घेण्याची व ते बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर घासून पाहण्याची भावना उत्पन्न झाली आहे. तशी ती होणारच; कारण एक शोध लागला व तो चमत्कृतीजन्यसा वाटला कि ‘त्याच्यापुढे काय’ हे जाणण्याची पुन: जिज्ञासा होणे स्वाभाविक आहे. याप्रमाणे भौतिक शास्त्रीय ज्ञानाच्या वाढीबरोबर अशीही जिज्ञासा उद्भवणे साहजिक आहे कि, चर्म चक्षूंना अदृश्य व अगम्य, पण ज्ञानचक्षूंना गम्य असे स्वरूप तरी कसे आहे?
सद्गुरू – हि जिज्ञासा पुरी होण्यास सद्गुरू पाहिजेत असे आपले शास्त्र सांगते.
      वंदे गुरूंणा चरणारविन्दम / संदर्शितम् स्वात्मसुखावबोधं //
      जनस्य ये जान्गलीकायमाने / संसार हालाहलमोह्शांतै //
      सध्या शाब्दे परे च निष्णातं अशा सद्गुरुंचीच उणीव तीव्रतेने भासू लागली आहे. जनतेस खरे ज्ञान सांगून त्यांच्या बुद्धीस पटवून द्यावयास पाहिजे. ज्यांना ते पटले असेल अशांपैकी जे कोणी अभ्यास करून साक्षात्कार प्राप्त करून घेण्याच्या उद्योगास लागले असतील, त्यांच्या मार्गात येणा-या अडचणींना व लहानसहानसुध्दा येणा-या अनुभवांचा उमज व खुलासा करून देणारा व पुढील मार्ग दाखविणारा, असा ज्ञानी सत्पुरुष पाहिजे. जो स्वत: त्या मार्गावरून गेला असेल त्यासच त्यांतील सूक्ष्म भेद व ‘कोठे नडते’ ते कळेल. अशा सद्गुरूंची गांठ पडणे हे महत् भाग्य होय ! असे सद्गुरू भेटले तरी ते ओळखण्याची सामान्य माणसास पंचाईत पडते; कारण तोही माणसा सारखाच माणूस दिसतो. तो अगदी साधा दिसतो, पण त्याच्या सहवासाने त्याच्या ठिकाणचे विभूतीमत्व दृष्टोत्पत्तीस येते. सत्पुरुषांचा समागम मुद्दाम प्रयत्नपूर्वक करावा, त्यांची जरूर तर सेवा करावी, त्यांचे प्रेम संपादन करावे म्हणजे ते कृपाप्रसाद करतात. ते कृपा कशी व कोणत्या वेळी करतील हे कळूनही देणार नाहीत. त्यांच्या सहवासात वेदांत, अध्यात्म व अनुभव ज्ञान यांची चर्चा व साक्षात्कार यांशिवाय दुसरे काय प्राप्त होणार?
      सद्गुरुंस अनन्य भावाने शरण जणारास आत्मज्ञान करतलामलकवत् होते. त्यास परब्रह्माचा साक्षात्कार होतोच होतो.
      यस्य देवे परा भक्तीयर्था देवे तथा गुरौ //
      तस्यैते कथिता हृर्था: प्रकाशन्ते महात्मन: प्रकाशन्ते महात्मन: //             ...................................श्वेताश्वतरोपनिषत् ६:२२ 
      ज्याची देवाच्या ठिकाणी परमभक्ती आहे आणि जसा देवाच्या ठिकाणी अनन्य भाव आहे तसा गुरूच्या ठिकाणी ज्याचा अनन्य भाव आहे त्याला या महान आत्म्याच्या गोष्ठी सांगितल्या असता स्पष्टपणे कळतात. आत्मज्ञानाचा उपदेश केला असता साक्षात्कार होतो. द्विरुक्त्तीने तो होतोच असे निश्चयाने सांगितले आहे.
            वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !!
      परात्परतरम् ध्यायेत् ! नित्यमानंदकारकम् !!
      हृदयाकाशमध्यस्थम् ! शुद्धस्फटिकसंनिभम् !!
पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेन्द्रीये व मनबुद्धयादिक इत्यादिकांचा नियंता व प्रेरक आणि ज्याचे वास्तव्य मूलाधार चक्रावर मानले आहे अशा आत्मरूप बुद्धीदात्यास नमन असो ! त्याचप्रमाणे हंसावर आरूढ होणारी प्रणवरूपिणी वाग्देवता तिलाही वंदन असो !
निर्गुण, निराकार, परेच्या पलीकडील, सच्चिदानंदरूप अशा सहस्रदलकमळामध्ये स्थित असलेल्या प्रकाशरूप व परब्रह्मस्वरूपी सद्गुरू पदाचे ठिकाणी एकात्मभावाने लीन असो ! (संदर्भ षटचक्र दर्शन व भेदन)
अनुग्रह – पुष्कळ लोक कित्येकांकडून ‘उपदेश’ घेतात व कित्येक तो देतातही. कोणी कोणासही पाहिजे तो मंत्र सांगावा व गुरुशिष्याचे नाते जोडावे अशी परिस्थिती आहे. अशाने कोणाचेच कल्याण होणार नाही. सद्गुरू हे कोणालाही उपदेश घ्या असे कधीही सांगत नाही व सत् शिष्य ‘उपदेश द्याच’ असे कधीही म्हणत नाही. सद्गुरू सत् शिष्याचा अधिकार पाहून आपण होवूनच अनुग्रह करीत असतात.
‘उपदेश’ व ‘अनुग्रह’ यांत फरक आहे. सद्गुरू सत् शिष्यावर अनुग्रह करतात म्हणजे त्याच्या अंत:करणात शिरून त्याच्या बुद्धीतत्वास चालना देतात व त्याचा सर्व वृत्ती एकदम स्वस्वरूपी लीन करतात. त्यावेळी त्यास आत्मसाक्षात्कार होतो. यांस शक्तिपात असेही म्हणतात.
एक वेळ स्वस्वरूपदर्शनरूपी सिंहासनावर बसल्यावर मग तो उत्थान दशेत आला व लोकव्यवहार करू लागला तरी स्वरुपाची अखंड जाणीव त्यास राहते. पुढे दृढ अभ्यासाने तो ब्रह्मस्वरूपी लीन होतो. हा मार्ग आक्रमण्यास फार कठीण आहे. प्रारब्धकर्मानुसार अभ्यासात प्रतिबंध येतात, चित्तास विक्षेप उत्पन्न होतो व मन अस्थिर होते, पण सद्गुरूंची आर्त चित्ताने जो करून भाकतो त्यास कल्पवृक्षाप्रमाणे ते फलदायी होतात ! त्यांचे प्रेम कुर्मीप्रमाणे अलौकिक प्रेम असते. सद्गुरू शिष्याने करुणा भाकण्याची आवश्यकताहि ठेवीत नाहीत; तर ते आपण होवूनच अखंड प्रेम करीत असतात. सद्गुरूमातेची केवढी हि थोरवी !
सद्गुरू कोण ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
  साभार : संदर्भ : प्रनवोपासना.........श्री म वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: