मंगळवार, ३१ जुलै, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

ज्याने अहंकार केला तो या भूतलावर कर्तव्य करू शकणार नाही. सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. अहंकाराचा नाश करा. रागाचा नाश करा. अहंकाराचा नाश केल्याविना तुम्हाला सत् प्राप्त होणार नाही.

ज्या अवधीत रागाची स्थिती होईल त्या अवधीत नामस्मरणाची स्थिती करणे. मग राग आपणापासून दूर जाईल. रागाने जो या देहाचा नाश करतो तो या भूतलावर सुक्ष्म गतीने अती दु:खमय स्थिती प्राप्त करून घेत असतो.

मानवाने लीनतेने राहिले पाहिजे. स्थानावरून सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. जो लीनतेने; शांततेने स्थितीत राहील त्याच्यापासून सत् कदापिही दूर जाणर नाही. मानवाने आचरण करताना प्रथम लीनता पत्करली पाहिजे. जरी कलीयुगी स्थिती असली तरी आपण सत् सानिध्यातल्या ज्योती आहात. लीनतेने आचरण होईल त्यावेळी आपण सताला ह्रदयस्थ स्थितीत साठवून ठेवाल. अहंभाव असेल तर सत् आपणाप्रत रहाणार नाही. म्हणून अहंमतेचा नाश करून लीनतेने स्वीकार करा. मनन स्थितीत जर समाधान युक्त स्थिती असेल तरच मनन स्थिती स्थिर राहील.

माया ही चीज किती गंभीर आहे, अन् ही माया मानवाला सतापासून दूर नेते. मायेत गढून गेल्यानंतर मानवाला कल्पना येत नाही. जी स्थिर, शांत माया आहे तीचा मानव विचारही करीत नाही. सत् आपणास पदोपदी प्रणव देत होते मायेपासून दूर रहा. माया चंचल आहे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

सोमवार, ३० जुलै, २०१८

अंतरंगी रंगूनी जावे....5

अतरंगी रंगुनी जावे .......

यत्किंचित माया पण मायेसाठी केवढ्या गडबडी. मायेकरिता रात्रंदिवस झोप सुद्धा लागत नाही. ही माया आपण घेऊन जाणे शक्य नाही. अरे आपले कवच सुद्धा आपल्याल्या नेता येत नाही, आदेश सुटल्यानंतर तेथेच टाकून जावे लागते मग माया काय येणार बरोबर?

पण कांही लोकांची जाणीव असते की माया म्हणजेच सर्वस्व. माया सतावू लागली की मग सदगुरूंचा शोध घेतात.

त्रास कधी होतो मायेत गुरफटल्यानंतर. तेंव्हा मायेत रममाण न होता सत चरणात रममाण व्हा. मायेरहीत आम्ही नाही, तुम्ही नाही आणि अनंत म्हणतात तेही नाहीत.

माझ्या भक्ताने टाहो फोडला मग मलाही धाव घ्यावी लागते. मग मी तरी माया रहीत आहे का ? पण आमची माया कशी आहे? सत माया! अन तुमची माया कशी आहे?

सताची माया कशी असणार तर सम बुद्धीने सगळी कडे पाहणार, अंतरंगाचे तरंग असे असतात. क्रमशः
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

रविवार, २९ जुलै, २०१८

*श्री गुरुदेव पितामह*

मानव कितीही गप्प राहिला तरी त्याच्या अंत:र्मय स्थितीची कल्पना आम्हास येते. अंत:र्मय स्थितीत सत् आहे. तुमच्या अंतर्मय स्थितीत जी काही स्थिती चालू आहे त्याची सताला परिपूर्ण कल्पना आहे.

मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.

आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते? 

आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?

अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.

म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.

आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.

गुरुवार, २६ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद

आपला हा पंचमहाभूतांचा बनलेला देह आहे. आपल्या या देहात जवळ जवळ बहात्तर हजार नाड्या आहेत. त्यात प्रमुख बहात्तर. त्यावर तीन नाड्या: इडा, पिंगळा, सुषुम्ना. तीन नाड्या बहात्तर नाड्याना चेतना देतात आणि बहात्तर नाड्या बहात्तर हजार नाड्याना.

तीन नाड्याना चेतना देणारी एक नाडी आहे, तिला तुर्या म्हणतात. तुर्येकडून सूत्रे फिरली की सर्वस्व सूत्रे फिरतात. त्या तुर्येला सुद्धा चालना देणारे आणखी एक तत्व आहे. त्या तत्वाच्या इशाऱ्यावर तुर्या काम करत असते. पण ते तत्व मात्र अव्यक्त आहे. ते तुम्ही पाहिले पाहिजे अन त्यातच तुम्ही लय झाले पाहिजे.

अध्यात्माच्या वा योगाच्या सहाय्याने तुम्ही तुर्येप्रत जाऊ शकता पण पुढे जायला अडचणी येतात. तुर्या म्हणजेच बिंदू! कुणी त्याला ज्योत म्हणतात.

मग आता लक्षात घ्या या सर्व नाड्यांचा अधिपती तोच गणपती ! त्याच्या सत्तेने सर्वस्व व्यवहार होत असतात. सर्व नाड्यांकडून ते कर्तव्य करून घेत असतात. गजासुराचा वध करण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्मावतार घेईल असे शंकराला संदेश मिळाले होते. अन् त्या नुसार गणपतीचे अवतार कार्य घेऊन गजासुराचा वध केला.

गणपती गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. ते समत्व बुद्धीने सगळीकडे पहातात. ओंकार समत्व बुद्धीने पाहणारा आहे म्हणून महेशानी म्हटले आहे 'समता वर्तावी | अहमता खंडावी !' गणपतीची पूजा करताना अहंकार रहित होऊन पूजा करा तरच तो कृपादृष्टीने पाहिल.

समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे,

                  गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा ।
                  मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

बुधवार, २५ जुलै, २०१८

मानवता धर्म.....2

आपण कोण आहोत अन आपला धर्म कोणता?
धर्म म्हणजे जात नव्हे, धर्म म्हणजे धारणा, पोषण अन कर्तव्य ! धारण करणे म्हणजे प्रथम धारणा, तदनंतर त्याचे पालनपोषण अन मग त्याचे कर्तव्य.

आता स्वधर्म कोणता?
तर मानवता. मानव हा अवतार आहे म्हणून मानवता हा धर्म. आता प्रथम धर्म तू जाणलास, माझे सत  सर्वठायी एकच आहे अशा समत्व भावनेने तू वागलास, समतेने वागल्यानंतरच त्याला मानवता धर्म कळला असे म्हणता येईल.

ज्या ठिकाणी मानवता असते तेथे लिनत्व असते. अशा या मानवतेला जर नामाची जोड मिळाली तर काय होईल?

मानवता म्हणजे सत मार्गाने जाणे, नितीमत्तेने वाटचाल करणे अन तुझ्यात वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्याची ओळख करून घेणे.

नामच तुला त्या अविनाशाची, सताची, ब्रम्हाची ओळख करून देईल. नामाच्या जोडी शिवाय हे होणे शक्य नाही. लक्ष्यात घ्या, तुकारामानी देखील आपल्या अभंगात सांगितले आहे,
                    "नामापरते नाही साधन ।
                      जळतील पापे जन्मांतरीची ।।"

मंगळवार, २४ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद*...1...*

पाचवा प्रणव वेद कशामुळे मिळतो ? कशामुळे प्राप्त होतो ?

ज्ञानमार्गाने मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञान मार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी जाऊ लागला, नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरूंशी बोलणे चालणे होऊ लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल. जरी तो प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालावयाची आहे.

प्रणव येणे बोल! जसे आपण बोलणे ऐकतो त्याच प्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकार स्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल, मग अशी ज्योत सद्गुरू सानिध्याने कुठेही जाऊ शकते.

पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरूगुह्य काय आहे हे समजणार नाही. जो पर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही तो पर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही.

पाचवा प्रणववेद सूरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो.

आम्ही हे म्हणतो ते खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्वाला देऊ शकतात. हाच पाचवा प्रणववेद! आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सूक्ष्मपणे कोठेही आदेशानुसार जाऊन येते की नाही?
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २३ जुलै, २०१८

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
सताप्रत प्रणव देताना, कळत नकळत असे प्रणव देणे योग्य नव्हे.
🍁🍁🍁🍁🍄🍄🍁🍁🍁
माया ही तुमची आहे. आमची नाही. आम्हाला मायेची काही गरज नाही.
🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺
स्थुलाला मायेची गरज ही असतेच असते. तुम्हालाच माया जवळ केली पाहिजे अन् मायेचे कर्तव्यही केलेच पाहिजे.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जितकी शरीरे, तितकी मने अन् प्रत्येकाचे आचार विचार वेगवेगळे.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
सर्वस्व मनानी एकच विचार केल्यानंतर आपण सतसान्निध्यात राहू.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्रध्दा असली तर सर्वस्व स्थिती. श्रध्दा असून मन चंचल झाल्यास कर्तव्य होणार नाही.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मानवाची मनन स्थिती शांत आणि स्थिर असावी. यालाच श्रध्दा आणि सबूरी म्हणतात.
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄

शनिवार, २१ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*3

सेवेकरी पूर्णत्व सत् मय राहीला तर षड्:रिपू त्या सेवेक-याप्रत जाऊ शकणार नाही. कलियुगी स्थितीत मानव पूर्णत्व मोहमायेत गुंतलेला असतो. हि मोहमाया मानवापासून दूर जाऊ शकत नाही.

आपणास पूर्णत्व कल्पना आहे सताने या पृथ्वीतलावर कर्तव्य केले ना? ज्ञानार्जन देखील केले. मानवाला मोहमायेतून सोडविण्यासाठी परिपूर्ण स्थितीने कर्तव्य केले. आपणास सानिध्यात घेऊन ज्ञानयुक्तता केली. परंतु मानवाच्या मनाची चंचलता दूर होत नाही. मानव मुखाने परिपूर्ण प्रणव देतो पण मननतेने ही स्थिती होत नाही.

म्हणून मानवाने प्रथम मनाची शुद्धत्वता केली पाहिजे. सताने आपणास स्थूल दिधले आहे. स्थूलाने आपणास कर्तव्य करता येईल. त्याचवेळी मनाने आद्य कर्तव्य येणे नामस्मरण केले पाहिजे. पण ते होत नाही. स्थूल कर्तव्य करते अन् मन मोहमायेचे कर्तव्य करीते. पण तेच मन सतमायेत गेले तर कर्तव्याला परिपूर्णता येईल.

मानवाला मोहमायेत कोण गुंतवते? तर मानवाचे मनच मानवाला संसारमय स्थितीत गुंतवते. मानव संसारमय स्थितीत मोहमायेमुळे गुंततो. असाच मोह जर मानवाला भक्तीत झाला तर सेवेकरी सताप्रत जाऊन स्थिर होईल. अन् संसारमय स्थितीत स्थितप्रज्ञ होईल.

संसार मानवाचा नाही तर ती त्या परब्रह्माची निर्मिती आहे. परंतु मानव असे मानत नाही. मानव म्हणतो सर्वस्व माझे आहे. पण मी कोणाचा आहे याची जाण विसरतो.

सताने स्थूलात असताना सर्वस्वाची तुम्हा सेवेक-याना पूर्णत्वता कशी आहे याची जाण दिधलेली आहे. पण मानव मोहाला अधिक भूलतो. त्या संसारमय स्थितीसाठी मानव तन, मन, धन सर्वस्व समर्पित करीत असतो, परंतु सतासाठी समर्पितता नसते. अन् म्हणूनच मानव मोहमायेत गुरफटतो.

आपण म्हणता संसार! कोणाला नाही? सताचा देखील संसार आहे. परंतु ज्या परब्रह्माने संसाराची निर्मिती केली ते मात्र त्यात गुंतून राहिले नाहीत. एवढेच नाही तर सर्वस्वांसाठी परिपूर्ण स्थिती करीत आहेत ना?

सताने आपणास अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याची स्थिती केली पण तुम्हाकडून अज्ञानाची स्थिती दूर करण्याची स्थिती पूर्णत्व होत नाही.

आपण प्रणव द्याल आम्ही कलीयुगी मानव आहोत. पण सताने या कलीयुगातच कर्तव्य केले आहे. जोपर्यंत मानवाच्या स्थितीत अहंम आहे तो पर्यंत तो पूर्णत्व होऊ शकत नाही. मानवाने आपसातील अहंमतेचे खंडण केले पाहिजे.

*श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी*

जर आपणास मायावी कर्तव्यासाठी वेळ पुरत नाही तर मग सत् कर्तव्यासाठी अवधी मिळणार नाही.

मानवाचे शरीर कर्तव्य करीत असते. मनाने मानव मायेचे कर्तव्य करीत असतो. पण त्याच स्थितीप्रमाणे जर मानवाने अपुले मन सतात गढवून ठेविले मग इतरत्र स्थिती जी आपणास दिधली आहे त्याने तुमची कर्तव्य केली तर ती कर्तव्य होऊ शकतील.

दोन्ही स्थितीत मानव कर्तव्य करू शकतो. म्हणून मन दोन्ही स्थितीत ठेवायचे. सताप्रतही ठेवायचे अन् कर्तव्यातही ठेवायचे.

कर्तव्य केल्याविना मानवाला मायेची स्थिती प्राप्त होणार नाही. अन् माया ही मानवाला हवीच आहे. जर माया नसेल तर मानव काही करू शकणार नाही.

मानव सतावरच स्थितप्रज्ञ असतो म्हणून मानवाने आपले मन सताप्रत ठेऊन कर्तव्याची पूर्णत्वता केली पाहिजे. मग मानव संतुष्ट होईल. मानवाने सतात परिपूर्णता केली तर तो या विषयांतरात एकाग्र पणे राहील. नुसत्या विषयांतरात येणे नुसत्या कर्तव्यात राहिले तरीही तो मानव संतुष्ट होऊ शकणार नाही. दोन्ही स्थितीने राहिल्यानंतर मानव संतुष्ट राहिल.

सर्वस्व स्थिती सतानेच उपलब्ध करून ठेवलेली आहे. सताची मनोकामना कोणती असते? सताचीही मनोकामना असते कि मी जे स्थूल येणे शरीर या स्थितीत पाठवले आहे त्या शरीराला विषयांवरची जरूरी अधिक आहे. जर विषयांतर नसेल तर शरीर काम करू शकणार नाही. नुसत्या शरीराचा पुतळा करून उपयोग नाही, तर त्याच्याकडून कर्तव्य करून घेतलेच पाहिजे. जर कर्तव्य ही स्थितप्रज्ञ नसतील तर तुमचे शरीर काही करू शकणार नाही. विषयांतर म्हणजे मानवाला दिनात करावी लागणारी अनेक कर्तव्ये होत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

गुरुवार, १९ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*2

तन सताने दिधलेले आहे, मन सताने दिधलेले आहे, धन सताने दिधले आहे. ते कर्तव्यासाठी दिधले आहे. मानवाने त्याचा यथायोग्य वापर केला पाहिजे.

तन मिळाले म्हणून त्याची कशीही स्थिती करणे यथायोग्य नाही. मनाची यथायोग्य स्थिती केली पाहिजे अन् धनाचाही यथायोग्य उपयोग केला पाहिजे.

मानवी स्थिती प्रमाणे सताने तुम्हांस माया हे धन अशी स्थिती दिधलेली नाही. त्या खेरीज तुम्हाला एक फार मोठे धन दिधलेले आहे. मायावी धन तुम्हापासून कोणीही हिरावून घेऊ शकेल परंतु सताने समर्पित केलेले धन कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग सताने दिधलेले धन श्रेष्ठ आहे ना? परंतु मानवाला ह्या धनाची किंमत कळत नाही, परंतु मायावी धनाची किंमत कळते. कारण मानव समजतो कि मायावी धन त्याने कमविलेले आहे.

जर मानवात सताने वास केला नसता तर तो हे मायावी धन कसा बरे कमवू शकेल? वास्तविकतेत जर मानवाची अशी धारणा असेल तर तो सतापासून दूर जावू शकणार नाही.

सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधलेली आहे पण आपण ते जाणीवेत ठेवले नाही. कोणतीही स्थिती असो, कलियुग स्थिती असो नाहीतर आर्यवर्त असो. कलियुग कशामुळे प्राप्त झाले? याची जाण सताने आपणास दिधलेली आहे. कलियुग असून देखील सत् कर्तव्य परायणता साधत होते ना?  अशा सताच्या स्थितीतील आपण मानवी ज्योती आहात. मग याची जाण आपणास असावयास, यावयास हवी.

सतानी आपणास जे तन, मन, धन दिले आहे ते कर्तव्यासाठी. कर्तव्य करीत असताना सेवेक-याने दृढ:निश्चयी राहिले पाहिजे.

आपणात असणाऱ्या "मी" ची जाण घेऊन कर्तव्य केले तरच भक्त सत् शुद्ध होऊ शकतो. अन् अशा भक्तांपाशी संयमता अन् लिनता वास करून राहते. असा भक्त सताला सांगू शकतो, *"आहे हे सर्व आपूलेच आहे. आपण आम्हास ते कर्तव्या करीता प्रदान केले आहे. आम्ही केवळ निमित्त आहोत."

* हा पंचमहाभूताचा देह परमात्म्याने निर्माण केलेल्या निसर्गाशी संधान ठेऊन राहिला अन् त्याचा कर्तव्यासाठी यथायोग्य स्थितीने वापर केला तरच तो शुध्द राहिल. हा मानवी देह असेपर्यंत क्षणिक मायेला न भूलता सद्गुरूंनी आपणास जे अमूल्य धन प्रदान केले आहे येणे जे "अखंड नाम" बहाल केले आहे, त्याबरोबर तन्मयता साधल्यास सद्गुरु आपणापासून कधीही दूर जाणार नाहीत.

टायपिंग: श्री सुभाष भोसले