गुरुवार, १४ जून, २०१८

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |* 2

*ॐनमोजी सदगुरु परब्रह्म |*
*तूं  निर्विकल्प कल्पदृम ||*
*हरहृदयविश्राम धाम |*
*निजमुर्ति राम तूं स्वयें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

गुरुगीता कोणी कोणाला प्रणवाकृत केली आहे, तर महेशाने अंबेला प्रणवाकृत केली आहे. या गुरुगीतेत सदगुरुपदाची महती दिधलेली आहे. गुरु अन सदगुरु यामध्ये काही स्थिती आहे ना?

आपण सर्वस्व सेवेकरी मानवी स्थितीत आहात. आपुले गुरू किती आहेत अन सद्गुरु किती आहेत? आई, वडील, विद्यार्जन करणारे ते गुरू, ज्ञानार्जन करणारे ते सद्गुरू! पण मानवाच्या स्थुल देहातच काही गुरू वास करून आहेत. याची मानवाला कल्पना आहे का? मानवी स्थितीप्रमाणे माता गुरू, पिता गुरू, विद्यार्जन करणारे गुरू पण ज्ञानार्जन करणारे ते सदगुरु! त्यांना गुरू म्हणता येईल का?

परंतु मानवी देहात जे पाच गुरू आहेत त्याची मानवाला कल्पना आहे का? आपणास पदोपदी प्रणव मननतेत बिंबवले पाहिजेत. तुमच्या स्थुल देहात जो राम आणि जे सत आहे, जे सद्गुरू आहेत ते तुम्हास पहाता आले पाहिजेत. सद्गुरूंनी स्थुलात असताना हे कर्तव्य केले, ते तुम्हांस सताचा अर्थात सद्गुरूंचा वास आपल्या देहात कसा आहे हे दाखविण्याचे कर्तव्य सदोदित करीत होते अर्थात तो त्यांचा अधिकार होता. मग आपल्या देहातील पाच गुरूंकडून अर्थातच या पंचमहाभूतांनाकडून आपण काय स्वीकृत केलेत.

पंचमहाभूतांपासून देह बनला पण देहापासून बुद्धि कदापीही नाही. ती बुध्दी आत्मस्थितीपासून प्राप्त होते. या पंचमहाभूतांपासून आपण एकच स्थिती प्राप्त करु शकता अन ती म्हणजे संयमन! संयमाने मानव पूर्णत्वाने ज्ञान ग्रहण करु शकतो. अन ज्ञान ग्रहण केल्यानंतर पुढील स्थिती प्राप्त होते.

ज्ञानार्जन मानवाला कोणापासून प्राप्त होते ? तर सद्गुरूंपासून ज्ञान मानवाला प्राप्त होते. जोपर्यंत सत, परब्रह्म, सद्गुरु मानवास जवळ घेत नाही, सर्वस्व स्थितीने शुद्धत्व करीत नाही तोपर्यंत मानव अज्ञानी असतो. ज्या अवधीत सद्गुरु सेवेकऱ्याला आपणाप्रत घेतील, आपले बहुमोल प्रणव प्रदान करतील, अन षडरिपूच्या वलयाने वेष्टीलेल्या मनाला शुद्धत्व करतील त्यावेळीच तो ज्ञानार्जन करु शकेल. अन हे सर्वस्व सद्गुरुविना कोणीही करु शकणार नाही.

मानवाची स्थिती चलबिचल का होते? कारण तो सद्गुरूंच्या प्रणवांचे मनन पूर्णत्वाने करत नाही. मानव संयमतेने, एकनिष्ठ श्रध्देने सद्गुरु चरणाप्रत लीन राहिला तर तो मानव सद्गुरूंपासून दूर जाणार नाही. परंतु मन अस्थिर झाले तर मात्र तो सद्गुरूंपासून दूर जातो. म्हणून मानवाने मन सदोदित सद्गुरु चरणाप्रत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: