शुक्रवार, १२ जून, २०२०

मायेचे प्रकार - प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)     
                            मौलिक ठेवा
माया दोन प्रकारची असते असे आपली माऊली आपणांस सांगते. एक सत् माया आणि दुसरी मोह माया. 

सत् माया कशाला म्हणतात आणि मोह माया कशाला म्हणतात?

तर सताने आपल्या भक्तासाठी केलेली माया ही सत् माया व आपण मानव जी माया स्वार्थासाठी करतो ती मोह माया. सत् जेव्हा माया करते, तेव्हा सताकडे स्वार्थ बुध्दी नसते. तर भक्ताचे कोटकल्याण व्हावे हीच सदिच्छा तिच्यामध्ये भरलेली असते. सत् नेहमी आपल्या भक्ताच्या भल्याचाच विचार करीत असते. 

ह्याउलट आपण एखाद्यावर माया करताना आपला काही ना काही स्वार्थ त्यामध्ये दडलेला असतो. ब-याच मायावी अपेक्षा त्यामध्ये गुंतलेल्या असतात. काही अपवाद वगळता निस्वार्थपणा त्यामध्ये नसतो. असते ती फक्त अपेक्षा. असतो तो स्वार्थ. 

म्हणूनच आपले बाबा म्हणतात, "इतरांची गोष्ट सोडा पण सेवेकरी देखील असा विचार करतो. जे सत् उपदेश रोज ऐकत आहेत. ज्यांच्या पुढ्यात सत् उपदेशाची खाण उघडी करून ठेवलेली आहे, साक्षात सद्गुरू मुखातून सत् उपदेश प्राप्त होत आहे, तरी देखील सेवेकरी माझे तुझे केल्याशिवाय सोडत नाही."

🙏🙏🙏

माया - प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा
                       मौलिक ठेवा

मानव कोणत्याही प्रकारचा विचार करताना, हे माझे, ते माझे अशाच पध्दतीने विचार करीत असतो. तो माझे या खेरीज दूसरा विचार करत नाही. 

कां बरे तो असा विचार करीत असतो?

ह्याला कारण ती माया. माया कुणाला सुटली आहे कां? ह्याचे उत्तर पाहिले तर असे दिसून येईल की ती कुणालाही सुटलेली नाही. खरंच आहे ते. भगवंत म्हणतो मला देखील ती सुटलेली नाही. मग जर ती भगवंताला सुटलेली नाही, आपण तर शुद्र मानव. आपल्याला देखील ती कशी सुटेल? खरंय ना. अगदी खरंय. शंभर टक्के खरंय.

पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे भगवंत जरी म्हणत असले की मला देखील माया सुटलेली नाही, तरी ती कोणती माया? याचा आपण विचार करावयास हवा.

आता आपण म्हणू माया म्हणजे माया. ती एकच प्रकारची तर असते?

तर नाही. आपण इथेच तर गफलत करतो. आपल्यासाठी माया ही एकच प्रकारची असते. परंतु भगवंत म्हणतात, ती दोन प्रकारची असते.......
(अनगड - श्री सद्गुरू माऊलींच्या चरणाचा पाईक). क्रमशः

मानवाच्या मनाची शुध्द गती-प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                            मौलिक ठेवा
                            🙏🙏🙏
मानव मनाच्या शुध्द गतीने कृतीमान असला पाहिजे. शुद्ध गती म्हणजे कोणती स्थिती? असा प्रश्न सर्वस्वांना पडणे स्वाभाविक आहे.

तर शुध्द गती म्हणजे मनाची शुद्धता असणे गरजेचे आहे. म्हणजेच मनामध्ये कोणत्याही प्रकारची विकल्पता असता कामा नये, कोणाबद्दल ही शंका असता कामा नये. शंका-कुशंका मनामध्ये आली की मन स्थिर राहू शकत नसल्याने, मनाची स्थिती कशी होत असते? तर दोलायमान, अस्थिर. अशा स्थितीमुळे मन चलबिचल होऊ लागते. मनामध्ये ना-ना त-हेचे चुकीचे विचार येऊ लागतात व मानव सत् मार्गापासून, सन्मार्गापासून भरकटला जातो. अशावेळी तो संपूर्णपणे मायेच्या अधीन जातो. सताचा त्याला विसर पडतो. जे शुभलक्षण नव्हे.

म्हणूनच बाबा म्हणतात, "मानवाची कृती नितीमत्तेची असेल तर त्याला दुःखाची झळ जास्त लागणार नाही, त्याला सुखच जाणवेल. म्हणजेच ब-याच गोष्टी ह्या त्याच्या मनाप्रमाणे घडू लागतील, ज्याला सुख असे म्हटले जाते.
अशा मानवाला सुखाचीच जाण जास्त जाणवेल. 

पण त्याची कृती जर हीन असेल, त्याचे अशुद्ध विचार असतील, त्याचे अशुद्ध वागणे असेल, त्याच्यामध्ये अहंकार भरलेला असेल, पूर्णतया स्वार्थ भरलेला असेल, मग अशा मानवांना सुख मिळू शकेल का? अशी बाबा आपल्याला विचारणा करीत आहेत. पुढे सद्गुरू माऊली म्हणते, त्यांना जे सुख मिळेल ते क्षणिक मिळेल. 

पण नीतीमत्तेने चालणा-या मानवांना जे सुख मिळते ते परामानंदाचे सुख मिळत असते. शुध्दबुध्दीने, समत्वाने जर तुम्ही सगळीकडे पाहिलेत तर तुम्ही स्वतःच यातून निभावून जाल. 

भगवंतानी सांगितले आहे की, हे मानवा ! तू जर हे सुखदुःख समत्वतेने सगळीकडे पाहशिल, तर तू स्वतःच स्वतः होशिल, म्हणजे *"अहंम् ब्रम्हास्मी"* 

याचा अर्थ - अहं म्हणजे मी आणि ब्रम्ह + असी यांचा संधी म्हणजे ब्रम्हास्मी हा शब्द होय. याचा अर्थ मीच ब्रम्ह आहे. 

यामध्ये *मी* मूर्त मानव आणि *ब्रम्ह* म्हणजे अमूर्त शक्ती. याचाच अर्थ मूर्तामध्ये अमूर्त किंवा सगुणामध्ये निर्गुण, आकारामध्ये निराकार यांचा जेव्हा संगम होतो, त्याचवेळेस ही स्थिती होत असते. ती म्हणजे *_अहं ब्रह्मास्मि_*

पण त्यासाठी सगळीकडे समत्वतेने पहाण्यासाठी मानवाच्या मनाची ठेवण किती उच्च व्हायला पाहिजे?
..अनगड (श्री सद्गुरू माऊलींच्या चरणाचा पाईक)......