सोमवार, ९ एप्रिल, २०१२

नामस्मरण ........ सर्वस्वावरील एकच उपाय !!!


जे सदगुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे त्यांच्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे.
२४ तासातून थोडा का अवधी होईना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यान-धारणा, अभ्यास, चिंतन हे केलेच पाहिजे. त्यालाच भक्ती मार्ग म्हणतात. तो न अंगीकारता आपण इतर उपद्व्याप करत बसतो, मग आपण अंतरंगात कसे रंगाल ? नेत्रतरंग कसे फाकतील ? तरंग फाकण्यासाठी शुभ्र-प्रकाश कसा प्राप्त होईल? हे सर्व होण्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता आहे. प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.
तुकाराम महाराज्यासारख्या महान संतांनी सुद्धा सांगितले आहे, नामापरीते नाही साधन, वाहतसे आण विठलाची.शपथ घेऊन सांगितले आहे, नामापरीते दुसरे कांहीही नाही. भक्तीमार्गाचा नाम हा केंद्र बिंदू आहे.
२४ तासात तुमच्या देहात किती अजपाजप होतो. अखंड नामालाच अजपाजप म्हणतात. २१६०० मोजून २४ तासात होते म्हणून तुमचा देह तरला आहे, उभा आहे. तर श्वास आणि उच्छवास किती वेळा चालतो? तर २१६०० वेळा. आत असलेल्या त्या भगवंताचे खाद्य ( नाम ) चालूच असते. त्यात तुम्ही भर घालवायची असते. मग उपास, तापास, निर्जळी लंघन ह्या सर्वांची किंमत नामस्मरणापुढे शून्य आहे. पण नामस्मरण करायला वेळ कोणाला आहे ? मायेच्या लटपटीत, खटपटीत वेळ मिळतो का? बसून ध्यान-धारणा होत नाही तर निदान रस्त्याने जाता-येता तरी करा. इतर व्याप करता, पण नामस्मरण नाही. पण प्रसंग आले किंवा इतर व्याप आले कि बाबांजवळ निवेदन करतात. मग सर्वस्व केन्द्रीकरण एकाच ठिकाणी होते. जर दुख: अंती परमेश्वर आहे तर सुखा अंती का असू नये? सुखा अंती तरंग येतात का? आपल्या दरबारात अनेक उदाहरणे आहेत. कुणावर प्रसंग आला कि बाबा येण्यापूर्वीच  दरबारात हजर. अन योग असा कि मीच त्या दिवशी दरबारात उशिरा येत असे. अशा वेळी त्यांचे तरंग बाबांकडे, कारण शांती मिळावी म्हणून. त्यापासून मुक्त व्हावे म्हणून. पण हे नेत्र तरंग नाहीत तर हे मायावी तरंग झालेत.
आपल्या दरबारातील सेवेकरणीचेच उदाहरण देतो, सेवेकरणीच्या आई वर प्रसंग आला ज्योत प्रकाशीत, तिला वाटले आपली आई आता जाणार. तिची इच्छा होती आपली आई राहिली पाहिजे. सेवेकरनीने आपल्या आईच्या छातीवर हात ठेवला. आई हात झटकतेय पण ती हात बाजूला करायला तयार नाही, अन सेवेकरनीने केंद्र बिंदू कुठे साधला, तर मुळाश्रम. त्यावेळी तिला अशी समाधी लागली कि शेवटी तिला संदेश मिळाले आता तू उतर, चिंता करू नकोस. आता तुझी माता स्थिर होईल त्यावेळी नेत्र तरंग नव्हते तर आपणावर जो प्रसंग येतो त्यातून सताने मला सोडवावे. सदगुरूने मला सोडवावे या साठी भक्त तळमळीने कार्य करतो. तो प्रसंग होता, ते तरंग नव्हते. अशी प्रत्येक मानवाची त-र्हा आहे. - भगवान महाराज

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

ॐ कार....!!!

ॐ कार....!!!
तेज म्हणजे प्रकाश. सूर्य उगवल्यानंतर तेज आहे. पण पृथ्वी आड गेली कि तो मावळतो. हि जी सर्व पंच महाभूते आहेत, त्यांना आकार आहे असे सांगता येत नाही. मग हि पंच महाभूते निर्माण करणारे जे परम निधान तत्व आहे, ज्यांना आपण अनंत तत्व, सर्वज्ञ म्हणतो, त्यांनी धूनधूनकारातून ॐ कार फेकले, त्यांनीच हि पंच महाभूते निर्माण केली आहेत. त्यात त्यांनी त्रिगुण टाकले, अकार, उकार, मकार टाकले अन तदनंतर आपण त्यात अदृश्य रुपी राहिले. तेच हे ॐ कार तत्व.
ॐ कारानीच सर्व माया पसरवली, माया पसारा निर्माण केला. चौर्याएैंशी  लक्ष योनी निर्माण केल्या. त्याचे अधिपती कोण तर अर्थाथ ॐ कार. तेच सर्वस्व त्रिगुणाची घडण घडवीत असतात..... उत्पती तेच, स्थिती तेच, आणि लय सुधा तेच करीत असतात. पण असे कळू देतात का? मीच सर्वस्व करीत असून सुद्धा स्वत: अकर्ते असतात. हि सर्व ठेव कशात आहे? तर तुमच्या देहात आहे. पंच महाभूते सुद्धा तुमच्या देहात आहेत. जे सर्व बाहेर विखुरलेले आहे ते सुद्धा तुमच्या
देहात आहे. प्रत्येक घटक हा सुद्धा ॐ कारमय आहे. त्यांनाच सत किंवा सदगुरु असे म्हणतात. तेच संकल्पविकल्पच्या पलीकडे म्हणजे निर्विकल्प आहेत. (संकल्प विकल्प प्रवचन - भगवान महाराज.)

गुरुवार, २२ मार्च, २०१२

सेवेकर्याची कर्तव्ये.........!!! गुरुदेव पितामह यांची प्रवचने......!!!


आपण सताचे सेवेकरी आहोत, आणि सताचा सेवेकरी सत सानिध्यात श्रद्धायुक्त स्थीतिने राहिला तर त्याला अघोर सूक्ष्म त्रास देऊ शकणार नाही. आपण सताशी तादाम्य स्थितीने राहिले पाहिजे. त्रास झाल्यानंतर स्थानात येऊन प्रणव द्यावयाचे पण स्थानात येऊन सताची भक्ती कोणी करायची? सताने मानवाला पूर्णत्व शांततामय स्थिती करावी अशी प्रत्येक मानवाची मनीषा असते पण सताची सुद्धा मानवाकडून मनीषा असतेच ना? कोणती मनीषा, तुमच्या धनाची नसते, संपत्तीची नसते, शारीरिक स्थितीची नसते तर फक्त तुमच्या श्रद्धेची. प्रथम मानव काय म्हणतो? माझी कौटुबिक स्थीती आहे , मला कर्तव्य करावयाचे आहे, पण त्रास होऊ लागला कि मग दरबारात येतो. दरबार येणे सताची कौंटुबिक स्थिती.
आपण सर्वस्व एकाच स्थितीत येता म्हणजेच सताची कौंटुबिक स्थिती होय. सत स्थुलात असताना कोणते प्रणव द्यावयाचे? अरे! हे माझे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजेच कौटुबिक स्थिती. हि कलियुगी स्थिती आहे आणि या कलियुगात मानवाला अनेक कर्तव्य आहेत पण प्रथम कर्तव्य कोणते? तर सत नामस्मरण. सत नामस्मरण हे मानवाचे  आद्य कर्तव्य आहे. मायावी स्थितीत तुमच्या धनाची, मनाची, शरीराची झीज होईल पण सत नामस्मरणाने तुमच्या धनाची, मनाची, शरीराची कोणती स्थिती होईल? तर तेजोमय स्थिती होईल आणि सत तुमच्यात पूर्णत्व सहवास करून राहील. मग अघोर सूक्ष्म तुमच्या सहवासात राहील का?
मानवाला माया आहे तशी सतालाही माया आहे. तुम्ही सर्वस्व हि सताचीच माया आहे. तुमची पूर्णत्व स्थिती करून देणे हे सताचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सताचे नामस्मरण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. हे जर मानवाने केले तर तो सतापासून दूर राहील का? नाही राहणार. तो सताप्रत येणारच. मानवाला शरीर देह मिळाल्या नंतर सुख हि आहे आणि दु:खही आहे. दोन्ही स्थितीत जर मानव एकाग्र झाला तर त्याला सताचे दर्शन दूर आहे का? ( गुरुदेव पितामह )

मंगळवार, २० मार्च, २०१२

अहम ब्रम्हास्मि........!!!


अहम ब्रम्हास्मि ----
मी तुझ्यातच आहे, प्रकाशाची जाणीव मिळाली नाही तर
ब्रम्हरूप कसे पाहता येईल?  प्रकाश मिळाला नाहीतर ब्रम्हरूप पाहता येणार नाही.
आत्म्याचे रूप पाहणे म्हणजेच ब्रम्हरूप पाहणे. तो निर्गुण स्वरूपी आहे कि सगुण
स्वरूपी आहे हे सुद्धा समजत नाही. पूर्ण प्रकाशात स्थिर होऊन ज्यावेळेला तो रममाण होतो त्या वेळेला प्रथम पायरी म्हणजेच स्वस्वरूपी जाणीव. तुझेच स्वरूप तुझ्या समोर आणतात ... त्यालाच स्वस्वरूपी जाणीव म्हणतात. त्याला ब्रम्हरूप हे पहिले पद आहे. सगुण रूप, प्रथम तुमचेच तुम्हाला दाखवतात. हे पाहिल्यानंतर मग तुम्हाला कळते अहम् ब्रम्हास्मि. हे पाहिल्यानंतर भक्त म्हणतो मीच ब्रम्ह आहे. माझ्या वेगळे ब्रम्ह नाही. हे कोणाच्या कृपेने होते? तर सद्गुरू कृपेने होते.  (परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रवचनातून.....)

शुक्रवार, २ मार्च, २०१२

अजपा-जप ......भाग तिसरा.....!!!

सो ऽ हम् :
हा जो अनायासाने सहजासहजी जप होत असतो यांत कोणता मंत्र जपला जातो हे आपण पाहू. एकांतामध्ये स्वस्थ चित्ताने बसावे व श्वासोच्छवासावर लक्ष ठेवावे म्हणजे श्वासोच्छवासाचे वेळी सो ऽ हम् सो ऽ हम् असे शब्द उमटतात असे प्रत्यक्ष अनुभवास येईल. श्वास आत घेताना ‘सो’ व बाहेर सोडताना ‘हं’ अशा त-हेने सोहंचा हा अखंड जप सुरु असल्याचे ध्यानी येईल.
श्री समर्थ म्हणतात –
एकांती मौन धरून बैसे / सावध पाहाता कैसे भासे / सोहं सोहं ऐसे / शब्द होती //
ऐसी हे अ-जपा सकळासी / परंतु कळे जाणत्यासी / सहज सांडून सायासी / पडोच नये //
आपण जागृत अवस्थेत अगर स्वप्नावस्थेत असलो किंवा गाढ निद्रेतही असलो तरी हा जप आपल्यास नकळत पाण्याचे प्रवाहाप्रमाणे एकसारखा सोहं, सोहं, सोहं असा सुरुच आहे ! या अखंड जपात सोऽहम् असा जप होत असतो. या मंत्राचे अक्षराकडे पाहिले म्हणजे कळून येईल कि, स: व अहं अशी दोन पदे यामध्ये आहेत. यांचा अर्थ असा कि तो मी (आहे), वेदांत शास्त्राचे दृष्टीने याचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ निरनिराळा आहे.
वाच्यार्थ असा कि, अज्ञानाच्या उपाधीमध्ये – अविद्येमध्ये – गुरफटलेले आहे असे भासणारे चैतन्य, म्हणजे अर्थात अहं विशिष्ट बिंदुमात्र जीव, हा मायोपाधिक सर्व जगावर सत्ता चालविणारा ईश्वर आहे. हा अर्थ घेतला म्हणजे या मंत्रात जीवा शिवाचे ऐक्य दर्शविले आहे असे दिसून येईल!  
लक्षार्थाने विचार केला तर असे कळून येईल कि, आपले स्वस्वरूप जो अंगुष्टमात्र आत्मा, तो अखिलव्यापी प्रकाशरूप परमात्मा आहे. या दृष्टीने आत्म्याचे व परमात्म्याचे यांत ऐक्य दर्शविले आहे असे ध्यानी येईल ! या जपाचे सकार हे शक्तीबीज आहे व हकार हे पुरुष बीज मानिले आहे असे समजावे. सकार बीज नामरुपात्मक दृश्य जडाचा उद्भव व लय कळून येतो ! या जपासम्बधी कित्येकांनी असे सांगितले आहे कि, श्वास आत घेताना स: म्हणजे तो ईश्वर मी आहे अशी वृत्ती स्वासाबरोबर आत घ्यावी व श्वास बाहेर सोडताना अहं म्हणजे मी ही अहंकार वृत्ती बाहेर सोडावी. अशा त-हेने देहाच्या अहंकाराचा त्याग करीत जावे व ईश्वर वृत्ती सतत आत साठवीत जावी म्हणजे कालांतराने आपणच सर्वव्यापी ईश्वर आहोत असा साक्षात्कार होईल ! याचा अनुभव अभ्यासाशिवाय मिळणार नाही. हे सहज शब्द आहेत. ही सहज उपासना आहे.
समर्थ म्हणतात –
उच्चारेवीण जे शब्द / ते जाणावे सहज शब्द /
प्रत्यया येती परंतु नाद / काहींच नाही //
ते शब्द सांडूनी बैसला / तो मौनी म्हणावा भला //
हा जप सर्व प्राणीमात्र करतात. परंतु तो फक्त जाणत्यासच कळतो व त्याचे रहस्य त्यास कळते. या सहज जपाचे रहस्य कळून घेतल्यानंतर इतर कोणत्याही मंत्रजपाचे सायासात पडण्याचे कारण नाही. इतर जप हे मुद्दाम उच्चार करून करावे लागतात त्यामुळे नाशिवंत आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ दगड उत्तम घडविला व मोठ्या सायासाने त्याचा जरी देव बनविला तरी तो केव्हाना केव्हा भंग पावणारच. देव मात्र सर्वव्यापी व सहज आहे. अशा स्थितीत सहज असणा-या देवावर विश्वास ठेवण्याऐवजी नाशिवंत दगडावर कोण विश्वास ठेवील? त्याचप्रमाणे या सहज अ-जपा-जपावर भावना ठेवली म्हणजे सहज देवाची उपासना आपोआपच होते, सहज जप होतो, ध्यान घडते, स्तुति होते व ईशस्तवन होते. अशा त-हेने जी सहज सेवा होते तीच सर्वव्यापी ईश्वरास प्रिय होते. म्हणून याच जपाचे रहस्य समजून घेणे व त्याचा अनुभव घेणे हे श्रेष्ठ कर्तव्य होय ! आपल्या देहरूपी घरांत सुरु असणा-या या ज्ञानभांडाराचे जर आपण ज्ञान करून घेतले नाही तर निद्रेवी पुरुषाप्रमाणे स्थिति होते. निद्रेव्यास द्रव्याचा साठा तळघरांत असला तरी सापडत नाही म्हणून तो दरिद्री राहतो. खाली लक्ष्मी राहते व वर हा दरिद्री वावरतो अशी स्थिति होते ! तळघरांत द्रव्याचा साठा, भिंत्तीत द्रव्याचा साठा, खांबात व तुळवटांतही द्रव्याचा साठा ! अशाप्रकारे सभोवार द्रव्य असून आपण मध्ये कोरडा तो कोरडाच राहतो ! अशा परिस्थितीत जो करांत असतो त्यास अधिक दारिद्र्य येते. ईश्वराची ही काय अगाध करणी ? कित्येक द्रव्य पाहतात तर कित्येक त्याचा उपयोग करतात. हीच प्रवृत्ति व निवृत्ति होय ! म्हणून या सर्व गोष्ठी लक्षात घेवून अंतरीच्या नारायणाची ओळख करून घ्यावी.
     या मंत्र जपास मालेचे कारण नाही व मोजदादिचेही कारण नाही. ईश्वरानेच प्रत्येक दिवशी २१६०० इतका हा जप होतो असे अगोदरच ठरवून टाकले आहे. आपण जर काय करावयाचे असेल तर ते एवढेच की, या जापाकडे अनुसंधान वृत्ति ठेवावयाची. सकाम कर्म चित्तशुद्धीस कारण असते. चित्तशुद्धीकरता म्हणून का होईना या सहजासहजी होणा-या मंत्रजपाचे फळ, प्रत्येक स्त्री-पुरुषाने आम्ही वर उध्दृत्त केलेल्या शास्त्रोक्त जपविधीचे, दररोज प्रात:काळी सूर्योदयाबरोबर उदक सोडून पदरात का पडून घेऊ नये?
सौजन्य: षटचक्र दर्शन .......लेखक: श्री म वैद्य