शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग तिसरा)

सगळे कसे आहे? तर महेशासारखे. त्यांची उपासना कशी आहे? तर “ॐ नम: शिवाय”. पण जरी महेशचे गण असले तरी सताला आदर देतात.

आपणास कल्पना आहे, समंधाने आपल्या ज्योतीला त्रास देऊन हैराण केले, तेव्हा आम्ही देखील ठरविले या समंधाला हैराण करून त्याचा नाश करावयाचा. मग पितामहानां सांगून महेशाकडे एका भैरवाची मागणी केली.

आता तुम्ही सांगा, भैरव असून तो आसनासमोर कसा काय नतमस्तक झाला. अन् आम्हालाच विचारता झाला, “काय संदेश आहेत?” आता हे कसे काय?

लक्षात घ्या, त्रिगुण सताला मानतात अन् त्यांचे लष्कर देखील सताला मानते. तुम्ही पाहता, महान महान दैवते देखील सताला मानतात. सध्याच्या युगात कोणालाही सत् भक्ति नको, कारण, सत् भक्ति कशी आहे? तर शांत ! आज ही जगात चालली आहे ती भक्ति नव्हे. भक्ति फार वेगळी आहे.

आपल्याला शुभ्र प्रकाश पाहिजे. नामस्मरण करा. मन संपूर्ण सत् मय करा. लक्षात घ्या, मन सत्-मय कसे होईल? तर संपूर्ण अर्पण केल्याखेरीज मन सत्-मय होणे शक्य नाही. म्हणून आम्ही आसनावरून सदोदित सांगत असतो, सेवेक-यांनो, मन सत् मय करा. काही ज्योती थोड्या अवधीपुरत्या मन सत्-मय करतात अन् पुन्हा मायाबाजारात अडकल्यानंतर सतापासून लांब जातात. मन सत्-मय करतांना आशी-पाशी बघत बसू नका. मन सत्-मय करण्याची तुमची प्रवृत्ती असते, हे आम्ही मानतो. पण त्या प्रकृत्तीचा देखील कस घेतला जातो. जो सत्-मय बनण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातच आजूबाजूला मोहमाया पसरवली जाते. खरोखरीचा भक्त असेल तर तो म्हणतो मला एकच माहिती आहे, माझे सत् हेच खरे आहे. अन् असाच भक्त टिकतो. पण बाकीचे दुरावतात. लक्षात घ्या, आपल्याबरोबर काय जाणार? सत् वा असत कृती! सत् असेल तर सान्निध्य देतील पण असत असेल तर सान्निध्य देणार नाहीत.
ज्ञानमार्ग म्हणजे प्रकाश ! हा ज्ञानमार्ग कशामुळे प्राप्त होईल? तर भक्तीच्या अनुषंगाने गेल्यानंतर ज्ञानमार्ग प्राप्त होईल. भक्ति म्हणजे काय, तर नामस्मरण !  अशा त-हेने भक्तिमार्गाने वाटचाल करीत गेल्यानंतर ज्ञानमार्गात पदार्पण करता येते. तुमच्यातील ज्योतींना सत्-पदाच्या आसनावरून अखंड नाम दिलेले आहे. पण काही ज्योतींना अजून ते मिळालेले नाही अशा काही भावी ज्योती देखील आहेत. अशा ज्योतीं देखील सद्-गुरु ! सद्-गुरु ! असे नामस्मरण करतील तर त्या देखील भक्तिमार्गाने जात आहेत असे म्हणता येईल.

ज्ञानमार्गात पदार्पण केव्हा होते? तर ज्यावेळेस सद्-गुरु अनुग्रहित करतात तेव्हा ! त्यावेळी ज्योतीस ज्ञानमार्ग मिळाला असे म्हणता येईल. प्रकाश मिळाल्याखेरीज ज्ञानमार्गाची गती सापडणार नाही. प्रकाश मिळविण्यासाठी सद्-गुरूंची सेवा करणे हे प्रत्येक सेवेक-याचे आद्य कर्तव्य आहे. सद्-गुरु प्रसन्न होतील, आदेश सुटतील, प्रणव मिळतील, तद्-नंतर अखंड नाम
सत्-पदावरून मिळेल. नंतर तुम्हाला ज्ञानमार्गाची चाकोरी माहित होईल, जाणीव मिळेल.
  
ज्ञानमार्ग आहे कठीण पण तसा तो सुलभही आहे. सुलभ कसा? जर ज्योतींचे मन अत्यंत शुचिर्भूत शुद्ध असेल तर अशा ज्योतीला ज्ञानमार्ग सुलभ आहे. पण या कलीयुगात मायावी मन हेलकावे खात असते. जरी आज या दरबारात बसून अत्यंत शुद्ध-शुचिर्भूत होऊन तुम्ही प्रवचन ऐकत आहात, पण या दरबारातून खाली उतरल्यानंतर ! इथे तुम्ही प्रवचन तन्मय होऊन ऐकता पण येथून गेल्यानंतर !

हे “पण” आहे ते संपले की मग खरा ज्ञानमार्गाचा मार्ग चोखाळता येतो. त्याकरिता हा “पण” संपला पाहिजे. परंतु हा “पण” संपत नाही. ज्ञानमार्गाच्या गतीने जायचे असेल तर “पण” आणि “परंतु” असता कामा नये. तेथें ठामपणा पाहिजे की मला हे केलेच पाहिजे. दृढनिश्चयी झाले पाहिजे.

भगवंतानी अर्जुनाला सांगितले होते, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”. जर आपण चालढकल केली तर ज्ञानमार्ग आपल्याला कसा मिळवता येईल?

ज्ञानमार्गाकरिता नामस्मरण हे अन्न आहे, खाद्य आहे. अखंड नामाच्या गतीशिवाय ज्ञानमार्ग मिळणे कठीण आहे. अखंड नाम प्राप्त झालेलेच ज्ञानमार्गाच्या गतीने जावू शकतील. पण अखंड नाम ज्यांना प्राप्त झाले आहे अशा ज्योती कशा हव्यात तर दृढ:निश्चयी. चालढकल करणा-या असून उपयोग नाही. ज्योतीने मनाशी असा दृढ:निश्चय करायला हवा की उठता, बसता मी नामस्मरण करीन. कारण नामस्मरणापलीकडे दुसरा मार्ग नाही. लक्षात घ्या, आम्ही देखील सदोदित अखंड नामाच्या गतीत असतो. नामावेगळे या त्रिभुवनात दुसरे काहीही नाही.

ज्ञानाचा, चैतन्याचा गाभा म्हणजेच नाम आहे. हा चैतन्याचा गाभा यालाच पांडुरंग म्हणतात, तेच नाम आहे. पांडुरंग हेच नाम आहे. पांडुरंग नामातीत असल्यामुळे तुम्हाला आकार दिसत नाही, पाहता येत नाही.  ते साकारल्यानंतर तुम्हाला आकार दिसतो, हे नामच सर्वस्व आहे. म्हणजे ज्ञानमार्गाचे मूळ कोठे आहे, तर सद्-गुरुंजवळ ! मग ज्ञानाबद्दल विचारणा कोणाकडे करायची, तर सद्-गुरुंकडे ! मार्गदर्शक कोण? तर सतच मार्गदर्शक आहेत. तुम्हाला सहाय्यभूत होण्यासाठी तत्वांना आदेश देऊन मदत करायला सांगतात. पण ज्योतीला जर प्रकाशाचा अनुभव नसेल तर पाठविणार कोठे?

तुकारामांनी म्हटले आहे, “ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप”. बाबा चैतन्यांनी अनुग्रहित केल्यानंतर तुकाराम म्हणाले की, “माझ्या ज्योतीच्या प्रकाशाच्या सहाय्याने तुझे रूप माझ्यात कसे वास करीत आहे ते पाहीन.”

पण ज्ञानमार्गाशिवाय ते असे म्हणू शकले असते का? प्रकाशाची जाणीव नसेल तर ते असे म्हणू शकतील का? तसेच नामदेवांनी देखील म्हटले आहे, “डोळियांचा डोळा उघडिला, आनंदाच्या डोही पाहिले” म्हणजे प्रकाशाच्या गतीने मी आज पांडुरंगाला देवळात पाहत आहे, अन् माझ्यात देखील पाहत आहे. म्हणून ते पुढे म्हणाले, “कदा न विसरे पाय खेचारांचे”.

लक्षात घ्या, सर्वस्व व्यापून उरलेले ते सतच आहे. विठ्ठ्ल, पांडुरंग, विष्णू, ब्रह्मदेव हे सर्वस्व मायेने विखुरलेले आहेत. पण या सर्वात असून अलिप्त असणारे तत्व म्हणजेच सत् आहे. मग ठाम होऊन सताचाच पाठपुरावा केला तर आम्ही खात्रीने सांगतो, तुम्हाला ज्ञानमार्ग सापडेल.

एकाच योनीत हे होणार नाही हे तितकेच सत्य आहे. एका योनीत हे प्राप्त होत नाही, त्याकरिता कितीतरी जन्म घ्यावे लागतात. आजपर्यंत तुम्ही किती जन्म घेतलेत, किती जन्मात तुम्ही सान्निध्यात होता, अन् किती जन्म तुम्ही घेणार आहात याची सर्वस्व जाण त्या अनंतांना आहे. परंतु आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. आपल्याला मानव जन्मात कशाला पाठविले आहे याची आपण जाण घेतली पाहिजे. माया सर्वास्वात विखुरली आहे. आपल्याला माया नाही तर सत् संचय करावयाचा आहे. मायावी त-हेने नव्हे तर सत् संपत्तीने सेवेकरी करोडपती बनला पाहिजे. अखंड नामाच्या गतीने तो अब्जोपती हवा.

अनुग्रहित ज्योत, प्रकाशित ज्योत कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही हे आम्ही खात्रीने सांगतो. कारण चुकीच्या मार्गाने गेली तर लाघव होण्याचा संभव असतो. चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर सत् तुम्हाला सोडणार नाहीत. त्यांना कल्पना असते, इतके जन्म या ज्योतीने घेतलेले आहेत, ज्योतीला सान्निध्य मिळालेले आहे, सान्निध्य देऊन अनुग्रहित केलेले आहे, अखंड नाम सत्-पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे. एवढे असून देखील ज्ञानमार्गाची चाकोरी सोडून हा विचित्र मार्गाने कसा काय जात आहे? म्हणून थोडेसे लाघव करतात. प्रेम असल्याशिवाय लाघव होणार नाहीत. आम्हाला माहित आहे, या कलीयुगात खूप ज्योती व्यापलेल्या आहेत. या व्यापातून सुटण्यासाठी रानोमाळ भटकतात. अनेक मार्ग पत्करतात, पण भक्तिमार्ग म्हटले की बिचकतात.

एकदा असेच व्यापलेली एक ज्योत, पेशाने शिक्षक, दर्शनाकरिता अली, अन् आम्हाला उलट सुलत प्रश्न विचारू लागली. आम्ही त्यांना विचारणा केली, आपण एका देवाचे तरी नामस्मरण योग्य त-हेने करता का? आज रामाचे नामस्मरण करता, तर उद्या कृष्णाचे करता. तर कधी शंकराचे करता, मग कोणता  देव आपणासमोर येणार? तुम्हाला राम कोण, हेच जर कळलेले नाही, मग नामस्मरणाचा उपयोग काय? ज्योत विचारती झाली, मग आम्ही काय करावे? आम्ही सांगितले, आहे राम म्हणजेच ओंकार. त्यांचेच हे स्थान आहे. या स्थानात भक्ति आहे. ज्योतीला भक्ति नको होती, त्यांना हवी होती माया. त्या ज्योतीबरोबर असलेली दुसरी ज्योत सांगू लागली की आम्ही देखील गणपतीची उपासना करतो. आम्ही त्यांना सांगितले, “गणपती म्हणजे सुद्धा ओंकारच”! तुम्ही ओंकारांची उपासना करून देखील तुम्हाला त्रास होत आहे, म्हणजे नक्कीच तुमचे काही तरी चुकत असले पाहिजे. काय चुकत आहे हे माहित करून घेण्यासाठी तुम्ही भक्ति केली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुम्ही काय चुकत आहात ते कळणार नाही. तुम्ही संकष्टी, विनायकी असे उपास करता. पण उपास गणपतीने करायला सांगितलेले नाही. गणपतीने सांगितले आहे, तुम्ही पोटभर जेवा, पण माझे ध्यान करा. तुम्ही एवढे उपास करता मग गणपती तुम्हाला प्रसन्न का झाला नाही?  दोन्ही ज्योती निरुत्तर झाल्या. मग आम्ही सांगितले, श्रद्धा असेल तर इथे या, आसनाचे घटक व्हा. मग पहा काय होते ते? आमच्या येथे भगतगिरि नाही. वेडपट लोकं देखील मानवात भटकत आहेत. पण भक्ति करा म्हटल्यानंतर यांना जणूकाय ओझे उचलल्यासारखे वाटते.

भक्ति ओझे वाटावी अशी आहे का हो? तर नाही. अशा वेडपट मानवांना नाम म्हणजे काय हे कळले असते तर? अरे ! नाम ही कामधेनु आहे. नाम म्हणजेच सर्वस्व आहे. असे मानव जर म्हणू लागले, नामस्मरण सोडून बाकीचे सांगा तर मग अशा लोकांना काय सांगावे? अनंतांनीच आम्हाला सांगितले आहे, “नाम म्हणजेच मी ! मी नामातीत आहे”. मग जर ते नामातीत आहेत मग ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र त्यांच्या वेगळे आहे का? ज्ञानमार्गाचा शोध लागल्याशिवाय त्यांचा शोध लागणार नाही. म्हणूनच ज्ञानमार्गाने जाणे, प्रकाशाच्या गतीने जाणे यथायोग्य होय. भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्ति अन् मग ज्ञान. म्हणजें प्रथम नामस्मरण ! नामस्मरणाखेरीज ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्तिमार्ग अन् तदनंतर ज्ञानमार्ग ! आपला सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने जावू लागला तर आज ना उद्या त्याला प्रकाशाचा मार्ग सापडेल. पण आपली जी चार तत्वे आहेत, ती मात्र त्याने टिकवली पाहिजेत. या चार तत्वांना तुम्ही चार वेद म्हटलेत तरी चालतील. अर्थात हे आमचे चार साधे वेद आहेत. जो सेवेकरी या चार वेदांचे काटेकोरपणे पालन करील त्याला एकदातरी मी स्थुलाने दर्शन देईन असे अनंताचे संदेश आहेत. स्थुलाने दर्शन देईन पण ओळखणारा पाहिजे. पण सद्गुरूंना, अनंतांना जर तुम्ही बनवू लागलात तर चूक कोणाची? तर चूक भक्तांची येणे सेवेक-यांची. सेवेक-याने जर ठाम निश्चय केला की मी बनवा बनवी करणार नाही अन् चारी तत्वांचे पालन करीन मग दर्शन कां बरे मिळणार नाही? एकदा कां चरणांवर स्थिर झालात की प्रकाश उजळलाच म्हणून समजा. तुकारामांनी म्हटले आहे, ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप !!
एकदा कां प्रकाश उजळला मग दिवसही नाही अन् रात्रही नाही. मग ते सतत चालूच असते. दिवसाही चालू अन् रात्रीही चालूच राहतो. कबीराने म्हटले आहे, “बुझे नही बत्ती”. तो प्रकाश मिळवणे म्हणजेच ज्ञानमार्ग मिळवणे. सद्गुरु कृपेने मिळालेले जें एक अखंड नाम, ही जी एक संपत्तीची ठेव मिळालेली आहे ती वाढवून परमगतीला जाता आले पाहिजे. अखंड नामाची करोडपती संपत्ती मिळवली पाहिजे. मायावी संपत्ती नव्हे. अखंड नामाची संपत्ती वाढणे म्हणजे संचित संपविणे होय.

आपण पाहतो, आपले गुरुदेव वशिष्ठ व इतर ऋषी-मुनी आज वर्षानुवर्षे अखंड नामात आहेत. त्यांचे नामस्मरण चालूच आहे. ऋषी-मुनी म्हणतात, हेच सर्वस्व आहे. या पलीकडे आम्हाला दुसरे काही नको. म्हणून आज ते सतत अनंताच्या सान्निध्यात आहेत. जसे, दृश्यांना प्रेम असते तसे अदृष्यांना देखील प्रेम असते. तुम्ही पाहता, पितामह सतत जेथे सत् आहे तेथें असणार. असे का ? तर  त्यांच्या संपत्तीची गणना करता येणार नाही. तुम्हाला तेवढे जरी होता आले नाही तरी निदान सत् संपत्तीने लखोपती बना. असे लखोपती जर तुम्ही बनत गेलात, असे जर अखंड नामयुक्त झालात मग ज्ञानमार्गाला वेळ नाही. तो क्षणात प्राप्त होईल.
 
पूर्वी दरबारात सर्वांनाच प्रकाशित करत असत परंतु त्यांना प्रकाश टिकवता येत नसे. म्हणून आता संदेश दिलेत, कष्ट करून प्रकाश मिळवू देत. त्यांना आयते मिळाल्यानंतर त्याची किंमत नाही. बाकीचे कसलेही कष्ट नाहीत, पण मन केन्द्रीकरणाचे कष्ट आहेत. जर तुम्ही मायेत केंद्रीकरण करू शकता मग सतात कां केंद्रीकरण करू शकत नाही. सताचेच नाम आहे. नामावेगळे सत् नाही अन् सतावेगळे नाम नाही. मग नामस्मरण करायचे कोणी ? भक्ताने केले पाहिजे. पण आपण ते करतो का? तर करत नाही. कां करत नाही? कारण आपल्याला माया श्रेष्ठ वाटते. आपल्याला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, संपत्ती पाहिजे, आराम पाहिजे अन् हे सर्वस्व मिळाले तर आपले बाबा खरे ! या भक्तीमध्ये सर्वस्व सामावलेले आहे. मुक्ती-मोक्ष  आहे, सायुज्यपद आहे, संसार देखील आहे.

अरे ! सगुणाचे सार म्हणजेच संसार ! सगुणात मी नाही असे तत्वच नाही. तुमच्या मनाजवळ जर चंचल वृत्ति असेल तर तुम्ही ज्ञानमार्गाने जावू शकाल? आपण मानसिक त-हेने व्यापलेलो असलो तर आपल्याला शांत निद्र येत नाही. म्हणून सर्वात प्रथम सद्गुरु सेवेक-याला संसारात स्थिर करतात अन् मगच त्याला नामस्मरण करायला सांगतात, पण सेवेक-याकडे आळस असल्यानंतर काय होईल. आळसामुळे शरीराला विश्रांती मिळते. नामस्मरण करायला नको, ध्यानधारणा करायला नको. मनाला ओढण लावायला नको. अशाने ज्ञानमार्ग मिळणे दुरापास्त आहे. प्रकाशाची जाण मिळणे हे देखील भाग्यच आहे अन् त्या प्रकाशाच्या गतीत दर्शन मिळणे हे त्याहूनही भाग्याचे आहे.

प्रकाश मिळाल्यानंतर तुम्ही स्थूलातून कारण देहांत जावू शकाल, महाकारण देहांत जावू शकाल. महाकारण देहातून अणु, रेणु, परमाणु पर्यंतही जावू शकाल. सगळीकडे सत् आहे. पण प्रकाश नसेल तर तुम्ही काय कराल? अनुभवाचे मिळविण्यासाठी ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग म्हणजे अखंड नामाचा स्त्रोत. नामस्मरण म्हणजेच अनंताचा जयजयकार ! मग अनंत म्हणतात की, तू मला प्रकाशात पाहू शकतील. अंधारातही मी तुला जाणीव देऊ शकेन. तुझ्यातच मी कसा वास करून आहे हे तू पाहू शकशील. हे सर्वस्व मिळविण्यासाठी प्रथम पायरी कोणती तर अखंड शुचिर्भूतपणा पाहिजे. मनामध्ये विकल्प चुकून येता कामा नये. सद्गुरूंच्या बाबतीत तर अत्यंत शुद्ध पाहिजे. कुणाला टिचकी मारून काय वदवतील ते सांगता येणार नाही. पण अशावेळी सेवेकरी मनाने अत्यंत ठाम असला पाहिजे. अशा ठाम सेवेक-याला ते सांगतात तू नामस्मरणाने वाटचाल कर. सद्गुरु तुमचे कधी नुकसान करतील असे आम्हाला वाटत नाही. सद्गुरु हे तारक आहेत. वेळप्रसंगी तुमच्यावर चिडतील, लाघव करण्याचे देखील आदेश देतील परंतु वेळ आली तर पाठीशी उभे राहतील. तुमच्या अंतर्यामी दयाघन तत्व आहे. सत्-पद हे दयाघन तत्व आहे.
समाप्त ..............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: