मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

सतचरण हीच मुक्ती...!!! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

सद्गुरू प्रिय ज्योत ती असते जी सदोदित सद्गुरू दर्शनात असते, सद्गुरुंच्या प्रणवांचे पालन करणारी ज्योत. सद्गुरू कडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करून ज्ञान वाढवणारी ज्योत.

पांचवा प्रणव ज्या भक्तांना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरू दर्शन ! सद्गुरू दर्शन हीच मुक्ती !

चारी वेद जेथे मौनावले तेथे मग चारी मुक्ती कुठे शिलक राहिल्या ?

स्थुलातुन सूक्ष्म, सूक्ष्मातून कारण, कारणातून महाकारण देह म्हणजे तेजोमय स्थिती.

ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपण चारी देहाचे व्यवहार करू शकतो. या चार देहातून ती ज्योत मुक्त होऊ शकते. कशामुळे? तर सद्गुरूमय झाल्यामुळे.

चारी मुक्तीच्या पलीकडचे सद्गुरू तत्व आहे. अविनाशी परम् तत्व जर प्रगट झाले अन त्यांच्या दर्शनात तुम्ही तादात्म्य झालात मग स्थूल राहील कोठे? सूक्ष्म राहील कोठे ? कारण राहील कोठे ? महाकारण राहील कोठे ? अशा ज्योतीला देहभान रहात नाही. तेथेच समाधी लागते.

समाधी म्हणजे त्या अनंताच्या शुभ्रप्रकाशाशी ज्योतिर्मय होणे अर्थात स्वतःचे जडत्व आपण विसरणे. जाणीव रहित होणे. तटस्थ होऊन त्या स्थितीत रममाण होणे. यालाच समाधी म्हणतात ! जवळ जवळ मृत्यूसमान त्याची गती असते. त्याचा जीव त्रिकुटीत अविनाशाशी लयबद्ध होऊन ब्रह्मांडी लय असतो. मग मुक्ती राहिली कोठे ? सतचरण आहेत तीच मुक्ती !
प पू सदगुरु बाबांच्या चारी मुक्ती म्हणजे , सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळविणे या प्रवचनातील एक भाग
टायपिंग:श्री रविंद्र वेदपाठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: