शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

*वाल्मिकी ऋषी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

वाल्या कोळी खून करीत असे. तत्पूर्वी ती ब्राह्मण कुलोत्पन्न ज्योत होती. पण ती चुकली.

ब्राह्मण कुणाला म्हणावे? "ब्रम्ह जाणे इति ब्राह्मण:"

मनाच्या व्यापाराची खिन्नता झाली.

ज्योत चारी तत्त्वांच्या चाकोरीबाहेर गेली कि भगवंत त्याच्यावर लक्ष देतात. पण वाल्या बायको मुलांचे पोषण करण्यासाठी खून करीत असे. हे पाहून श्रीहरीना विचार पडला कि ज्योत फार अघोरी कामे करीत आहे.

शेवटी नारदांचे व श्रीहरींचे खलबत झाले. नारद म्हणाले, "तुमचे त्या ज्योतीवर फार लक्ष आहे". तेव्हा श्रीहरी म्हणाले "नारदा तू तेथे जा". तेव्हा नारद निघाले. ते तंबोरा व माळ यासह होते. वाल्याला दोन दिवस सावज मिळाले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी वाल्याला नारद दिसले. त्याने आपली फरशी उगारली. तेव्हा नारद म्हणाले, "माझ्याजवळ काही नाही". पण वाल्याला फक्त मायेशिवाय दूसरे काही दिसत नव्हते. नारदांनी विचारले "तू हे कशासाठी करतोस?" तो म्हणाला, "माझ्या बायको-मुलांचे पोट भरण्यासाठी". तर मग आजपर्यंत जे पाप केलेस ते कोण भरणार? त्यावर वाल्या म्हणाला, "तीच भरतील."

नारद धीरोदत्त होते. नारदांनी सर्व सहन केले. ते म्हणाले मी उभा राहतो. हे तुझे पापाचे प्रायश्चित्त कोण भोगील ते तुझ्या माणसांना विचारून ये?

श्रीहरीनी लाघवांनी नटविल्यावर वाल्याला विचार पडला व तो आपल्या घरी गेला व पत्नीला म्हणाला, "मी एवढे खून केले. "पत्नी म्हणाली त्या पापाचा वाटा मी घेणार नाही". मुलांनी पण तेच उत्तर दिले.

मग वाल्या विचारात पडला. मी ही पापे मुलाबाळांसाठी केली पण पापाचा वाटेकरी मीच! तो तेथेच बसून रडू लागला. नारदांनी सांगितले म्हणून तो तेथे गेला होता. नारद म्हणाले,"आता तुझी कुऱ्हाड माझ्यावर चालव".

पश्चाताप होणे हेच खरे! नंतर वाल्या त्यांना शरण गेला व म्हणाला, "मला क्षमा करा." नारद म्हणाले, "ज्याचे त्यानेच भोगायचे. तू कसा काय मुक्त होणार?"

"त्यासाठी तुम्ही मला काही सांगा" असे वाल्या म्हणाला. नारद म्हणाले, "एक मंत्र आहे." नारदांनी त्याला "मरा" हा मंत्र दिला. मरा मरा राम राम हा मंत्र लयबद्ध स्थितीने जपता जपता, हा जप करत असता तद्नंतर त्यातून "राम" हा ध्वनी निर्माण झाला.

कित्येक वर्षे लोटली, श्रीहरी नारदांना म्हणाले, "तू कोणाला अनुग्रह दिला आहेस का?" आठवून तरी पहा. शिष्याबद्दल तू शंका का घेतोस?

नारदांनी विचार केला. त्यांना रामनामाचा ध्वनी ऐकू आला. त्याच्यावर वारूळ चढले होते. त्यावेळी तो अस्थिमय झाला होता. पण चैतन्यमय होता. तो समाधित गुंग होता.

नारदाचे बोल ऐकले अन् त्याने पाय धरले. नारदांनी त्यांना चेतना शक्ति दिली अन् म्हणाले, *"तू वाल्या नसून वाल्मिकी झालास"*

तुम्ही माझे सद्गुरु आहात. तुमची कृपा म्हणून मला हे पद मिळाले. *वाल्याने रामावतार होण्याआधी रामायण लिहिले.* आत्मदर्शन असल्याने वदघट असते.

"समर्थ भक्तिने मानव गेल्यास त्याच्या पापाच्या राशी नाश पावतील. पण ठाम श्रध्दा व समर्थ आदेशानुसार तुमचे वागणे असेल तर!"

यातून घेण्यासारखे म्हणजे खूनी मनुष्य देखील उध्दरीला जातो. सद्गुरूंनी मानवाला जर कोणते कार्य करू नको म्हटले व त्याने ते केले तर तो मानवाचा दोष आहे.

झाले गेले गंगेला अर्पण करायचे. आत्मदर्शन प्रकाशाखेरीज मिळणार नाही. एकचित्त होण्यासाठी सद्वर्तनाची चाकोरी पाहिजे. सत् कृपेच्या साह्याने समाधी लागते.

सर्व संत म्हणतात, "सद्गुरु हे परम् निदान आहे. ते असूनही अलिप्त आहेत."

हे सताचे आसन आहे. *प्रत्येक ज्योतीने आपले आचरण सत् शुद्ध ठेवले पाहिजे.* शंकेला थारा द्यायचा नाही. बाहेर अघोर कार्य करणारे मानव आहेत, त्यांच्या पासून दूर रहायचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: