Sadguru Darbar - सद्गुरू दरबार Dedicated to my beloved Sadguru Param Pujya Shri Sadguru Swami Bhagwan Maharaj. माझे परम् पूजनीय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांच्या चरणकमलावर सविनय सादर समर्पित.
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
सतचरण हीच मुक्ती...!!! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)
सद्गुरू प्रिय ज्योत ती असते जी सदोदित सद्गुरू दर्शनात असते, सद्गुरुंच्या प्रणवांचे पालन करणारी ज्योत. सद्गुरू कडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करून ज्ञान वाढवणारी ज्योत.
पांचवा प्रणव ज्या भक्तांना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरू दर्शन ! सद्गुरू दर्शन हीच मुक्ती !
चारी वेद जेथे मौनावले तेथे मग चारी मुक्ती कुठे शिलक राहिल्या ?
स्थुलातुन सूक्ष्म, सूक्ष्मातून कारण, कारणातून महाकारण देह म्हणजे तेजोमय स्थिती.
ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपण चारी देहाचे व्यवहार करू शकतो. या चार देहातून ती ज्योत मुक्त होऊ शकते. कशामुळे? तर सद्गुरूमय झाल्यामुळे.
चारी मुक्तीच्या पलीकडचे सद्गुरू तत्व आहे. अविनाशी परम् तत्व जर प्रगट झाले अन त्यांच्या दर्शनात तुम्ही तादात्म्य झालात मग स्थूल राहील कोठे? सूक्ष्म राहील कोठे ? कारण राहील कोठे ? महाकारण राहील कोठे ? अशा ज्योतीला देहभान रहात नाही. तेथेच समाधी लागते.
समाधी म्हणजे त्या अनंताच्या शुभ्रप्रकाशाशी ज्योतिर्मय होणे अर्थात स्वतःचे जडत्व आपण विसरणे. जाणीव रहित होणे. तटस्थ होऊन त्या स्थितीत रममाण होणे. यालाच समाधी म्हणतात ! जवळ जवळ मृत्यूसमान त्याची गती असते. त्याचा जीव त्रिकुटीत अविनाशाशी लयबद्ध होऊन ब्रह्मांडी लय असतो. मग मुक्ती राहिली कोठे ? सतचरण आहेत तीच मुक्ती !
प पू सदगुरु बाबांच्या चारी मुक्ती म्हणजे , सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळविणे या प्रवचनातील एक भाग
टायपिंग:श्री रविंद्र वेदपाठक
*नामदेव महाराज*2
ज्ञानेश्वरांनी नामदेवाला बोलावले व म्हणाले, "तुम्ही याचे कच्चे पक्के डोके पहा. गोराकाका तुम्ही याचे कच्चे, पक्के पहा."
त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारण्यास सुरूवात केली. तेव्हा नाम्या म्हणाला, "गोराकाका, तुम्हाला अक्कल आहे कि नाही."
तेव्हा गोराकुंभार म्हणाला, "हा कच्चा आहे. तेथे अभिमान दिसला."
त्यातून मुक्ता नाम्याला म्हणाली, "चिडतोस का?"
तेव्हा नाम्या तिच्यावर चिडला अन् म्हणाला, "मी विठ्ठलाला विचारतो."
तो विठ्ठलाला म्हणाला, " मी तुमचा आवडता असताना या लोकांनी माझा अपमान केला. मला कच्चा म्हटले. तेव्हा तुम्हीच पहा."
विठ्ठलांनी त्याची समजुत केली. विठ्ठल म्हणाले, " मला तू खरा पाहिला नाहिस. खरे रूप पहाण्यासाठी सद्गुरु करावा लागतो."
तर नाम्या म्हणाला, "तुम्हीच सद्गुरूं!" तेव्हा विठ्ठल म्हणाले सद्गुरु केल्याशिवाय काही नाही. तू खेचर यांना शरण जा.
नाम्याने आवड्यानाथाच्या देवळात जाऊन येसू खेचर यांचा शोध केला. येसू खेचर हे पादत्राणे घालून देवळात लिंगावर पाय ठेवून झोपले होते. ते पाहून नाम्याला वाईट वाटले. त्याला राग आला. जोरजोराने येसू खेचराचे पाय धरून बाजूला ठेवी तर तेथे लिंग! शेवटी आपले चुकले म्हणुन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. शरण गेला. तेव्हा खेचर म्हणाले, "आता खरी पश्चा:ताप दग्ध झालेली ज्योत आहे." तेव्हा त्यांनी नाम्याला बोलावले व डोक्यावर हात टाकला म्हणजेच अनुग्रह दिला. नाम्याला गहिवरून आले. माझ्या कल्याणासाठी विठ्ठलांनी कस घेतला.
टायपिंग: श्री सुभाष भोसले
सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८
*नामदेव महाराज*
त्यांचे वडील परप्रांतात गेले. त्यांची रूढी होती कि रोज विठ्ठलाला भोजन अर्पण करून मगच आपण जेवायचे. ते काम नामदेवाजवळ दिले. त्याला वाटे विठ्ठलांनी भोजन करावे. त्याना एकदा विठ्ठलाजवळ नेले. तेथे त्याना फार उशीर झाला. नामदेव म्हणाले " मी जेवण आणले ते तू का जेवत नाहीस." अन् म्हणाले, "विठ्ठला तुम्ही जेवला नाहीत तर मी इथे डोके आपटून जीव देईन."
तेव्हा विठ्ठलाने लाघवी नटवून भोजन केले. घरी आल्यावर त्याच्या आईला खरे वाटेना. वडील आल्यावर आईने त्यांना सांगितले, " नाम्या ताट रीकामा आणित असे."
वडीलांनी विचारले भोजन तू काय केलेस? खरे खोटे पहाण्यासाठी त्यांनी गुपचूप पहाण्याचे ठरविले व नाम्या जवळ भोजनाचे ताट दिले.
नाम्या म्हणाला "विठ्ठला तू जेव" विठ्ठल जेवला. त्यावेळी वडीलांनी नाम्याला धन्यवाद दिले. शेवटी तोच नामदेव 5 (पाच) वर्षाचा असताना, विठ्ठलांना जेवणास भाग पाडणारा पुढे संगतीने दरोडेखोर बनला.
पण पूर्व जन्माची ती सात्विक ज्योत होती. जरी दरोडे घातले तरी आवडया नागनाथाला नैवेद्य दाखवायचा.
नामदेव पंचक्वान्नाचे ताट घेऊन गेला त्याच वेळी एक गरीब आई व मुलगा ते भोजन पाहू लागली. नाम्याने ते भोजन मुलाला दिले.
दरोडेखोरांनी माझ्या नवर्याचा वध केला हे बाईचे शब्द ऐकून नाम्या विचारात पडला. कारण तो सत् होता. त्याच्या डोळ्यात अंजन पडल्याप्रमाणे झाले व त्याना रोज येण्याची मुभा दिली. अन् म्हणाला मी अत्यंत पापी आहे. असे म्हणून तो लिंगाला म्हणाला माझी सुटका करा अन् स्व:चा खंजीर काढून रक्त दिले. त्याला मुर्चा येऊन तो देवळात पडला. तेव्हा तेथे ब्राम्हण आले व त्यांनी पाहिले. नाम्याला उचलून बाहेर टाकले.
नवनाथ म्हणाले "तू ज्याला जेवण दिलेस त्यांनी तुला दृष्टांत दिला कि तू महत् पापी आहेस. तू येथे दिंडीला येऊ नकोस." तेव्हा त्याला फार वाईट वाटले.
माझ्यामुळे इतरांना आदेश नाही. त्यानी एक विठ्ठलाला पत्र लिहिले. ते वाचून विठ्ठल हेलावले. त्यात होते "मी अत्यंत पापी आहे. मी तुमचा नेम विसरणार नाही. पाच वर्षांचा असताना माझ्या हातचे जेवण तुम्ही केलेत. पण मी आता तुम्हाला तोंड दाखविणार नाही."
शेवटी त्याना भरून आले. विठ्ठलांनी जाणीव दिली तुला आता क्षमा आहे. तू दर्शनाला येऊ शकतोस. त्याला पश्चाताप झाला. तोच नामदेव विठ्ठलांचा भक्त झाला.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
*देही देखीली पंढरी । .....3
"अवघाची संसार सुखाचा करीन । दावीन तिन्ही लोकी ।।"
असे संतानी म्हटले आहे. खऱ्या भक्ताला आपल्या प्रपंचाची काळजी नाही. सत्य आपल्या संसारात स्थिर होण्यासाठी प्रथम आई वडील सत्याने वागणारे पाहिजेत. सत्याचे पालन झाले पाहिजे.
सत्पद म्हणजे दयाघन! ते कुणाला बोलणार नाहीत, तरीपण मानवांनी आपले आचरण सत् ठेवले पाहिजे.
चोख्याला विठ्ठलाशिवाय दूसरे काही माहित नव्हते. चोख्याने जाणले होते कि सत्यामुळे आदर मिळतो. सत्य टिकविले पाहिजे. सत्य हेच ईश! मायावी मन स्थिर राहणार नाही.
मानव हा क्षणभंगुर आहे. क्षणिक लोभासाठी मनुष्य पापे करतो. पण त्याला सुख शांती मिळत नाही. असत् कधीही स्थिर राहणार नाही.
मन हे मोक्षाप्रत नेणारे आहे. जगात कोणी महान किंवा मोठा नाही. संचिताप्रमाणे होत असते. गरीबी आली तर नाराज न होणे, श्रीमंती आली म्हणून हुरळून जाऊ नये.
समर्थ म्हणतात, "अमीरी ही चंचल आहे. श्रीमंत लक्ष्मी असते. मी गरीबीत असतो. मी कोणीही नाही. माझ्याकडून करून घ्या."
सद्गुरूंचे आदेश पाळा. समर्थ शक्तिपूढे मानवाचा ठाव लागणार नाही. सद्गुरु हे अत्यंत लाघवी आहेत. तुम्ही कोठेही असला तरी समर्थांचे ध्यान करा. त्यांची आठवण ठेवल्यावर मालिक सुध्दा म्हणतात कि, "माझे सेवेकरी मला विसरणार नाहीत."
सत् हे सर्व काही पुरवित असते. जन्म झाल्यावर आईच्या रक्ताचे दुधात रूपांतर सतच करते.
मनुष्य कर्माने दरिद्री होतो.
गर्वापासून आणलेली जी संपत्ती ती गर्वसंपत्ती.
विश्वव्यापी तेच परमेश्वर, पांडुरंग. तेच चोख्याला सर्व काही देत होते. सत् संपत्ती कुणी लुटली तरी संपणार नाही. ती कुणी लूटणार नाही.
"पांडुरंग म्हणजे शुभ्रप्रकाश! सद्गुरूंचा शुभ्र प्रकाश असतो."
प्रत्यक्ष चोखा आपल्या मुखाने म्हणत असे. शांती हि त्याची निजागंना म्हणजेच अर्धागिंनी आहे. तीच रुक्मिणी आहे. शांती असावी म्हणजे तृप्ती.
आकारले तितके नाशे. आपली दृष्टी नष्ट झाली तर सर्वस्व नष्ट होते. डोळे निर्माण होतात. बंद केले कि जाणीव होत नाही. पण त्यात जो प्रकाश मिळतो त्यातच सद्गुरु उभे असतात. त्यांच्या आदेशाप्रमाणे चालले पाहिजे.
मानव हा क्षणभंगुर आहे. सद्गुरूंची भक्ति परमश्रेष्ठ गतीची आहे. समर्थांनी कस घ्यायला सुरुवात केली म्हणजे ते त्याला नाचतात.
" हे भगवंता तुझ्या सत्तेने वेद बोलतात. सूर्य तुझ्या सत्तेने चालतो. तू ब्रम्हांडाचा धनी आहेस", असे नामदेव म्हणतो.
सद्गुरु तत्व ज्याने ओळखले तोच तहान भूक विसरतो. स्वार्थासाठी लाख उपद्व्याप केले कि पापाच्या राशी निर्माण होतात. मृत्यू गोलार्धात 83 लक्ष योनी आहेत.
सद्गुरूंना बनविणे म्हणजे महान अपराध आहे. सद्गुरूंनी शाप दिला तर त्याचे रक्षण करणारा कोणी नाही, असे स्वयंभू पार्वतीला सांगतात.
बी चांगले पेरले तर चांगले उगवणार. दृष्टी व कान यामध्ये चार बोटांचे अंतर आहे. त्याच चार बोटांनी मानव अधोगतीला गेले आहेत.
मालिक कस घेतात आपल्याला ह्याबद्दल आदर पाहिजे. माया, ममता, अहंकार यांना आदर न देणारा तोच माझा भक्त असे कृष्ण पार्थाला म्हणाले.
भगवंताबरोब मानव बरोबरी करू शकणार नाही.
"माया आपल्या बरोबर येणार नाही. अशाश्वत आहे तीच माया आहे."
चार चौकटीत म्हणजेच चार तत्वामध्ये सत् पदाने आहे तोच सेवेकरी आहे.
चोखा लीन, नम्र व शांत होता. तोच हा पांडुरंग जाणा । आपण जन्माला आल्यावर समर्थांना डोळे भरून पहा हिच खरी भक्ति. मनात शंका आणू नका.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८
*देही देखीली पंढरी।आत्माअविनाशी विटेवरी ।।*
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी)
काही मानव म्हणतात कि, "माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत."
"वैकुंठनायक तेच समर्थ!"
आपल्या सद्गुरु कर्तव्यासाठी ह्या गोष्टीचा काही मतलब नसतो. ज्याने सृष्टीला उत्पन्न केले आहे त्याला आपण काय देणार? त्याला आपल्या शक्तिने काय अर्पण करणार? आपण आपली चुक सुधारली पाहिजे.
चोखा म्हणतो, "माझ्या देहातच पंढरी आहे व त्यात पांडुरंग आहे त्याला मी पाहत आहे."
आजकालचा मानव क्षणिक लोभासाठी लबाड्या करतो.
ज्या ठिकाणी सत्य आहे तेथे यश आहे. "यश ते पार्थां मीच जाण" असे कृष्ण अर्जुनाला म्हणाले. ज्या ठिकाणी मी आहे त्याठिकाणी यश आहे. समर्थांना पहाण्यासाठी आपले आचरण चोख्याप्रमाणे पाहिजे.
संसार म्हणजे सगुणाचे सार!
पण निर्गुण काय आहे ते ओळखावे. आपण आहात हे आपणाला कळले पाहिजे. प्रथम आपली भूमिका शुध्द असली पाहिजे. "पळसाला पाने तीन".
संसार नीटनेटका असेल तर पाच मिनिटे भक्तिला बसता येईल. गरीबी पत्करली तरी चालेल.
मला पत मिळाली तर ती सत्यामुळेच मिळाली. सत्य असल्यानेच सर्वस्व आहे. चोख्याने सत्य कधी सोडले नाही.
संतोष व समाधान पाहिजे. कर्ते करविते वेगळे आहेत. म्हणजे सत्य संकल्पाचा दाता आहे. तरच ते पांडुरंग उभे रहातात. समर्थ म्हणतात, "मला जे करून घ्यायचे ते मी घेणारच." मालिक म्हणतात, "तुम्ही कर्तव्यात रहा, माझे लक्ष आहे."
सताला अपयश आणण्यास कोणी पाहिले तर तसे होणार नाही. मालिक कस घेतात पण त्याला ते कधी कमी पडू देणार नाहीत.
संतांमध्ये स्वार्थ नव्हता. म्हणून भगवंत संतांची चाकरी पत्करीत होते. मनुष्य नेहमी मायेत चुकतो. माझे काही नाही. माझ्यासह हे समर्थांचे आहे. अविनाशी आत्मा अमर आहे. सत् आपल्या ठिकाणी असेल तर काही कमतरता नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८
मन हे वारू.......!!!
मन हा असा वारू आहे, सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्यावरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?
मनावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही. केले नाही. करविता नाही. हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचि:र्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.
जय श्री सद्गुरू माऊली।
*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*
*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*
चोखोबा हा जातीने महार असून नितांत आदरणीय होता. त्याची कृती सत् व अभिमान रहित शुध्द अशी होती. तो म्हणे, "मला तुम्ही बनवले, तरी विठ्ठलाला कुणी बनविणारे नाही."
चोखोबाची वर्तणूक निष्कलंक होती.
संत म्हणजे शांत, विठ्ठल म्हणजे चैतन्याचा गाभा! चैतन्याचा गाभा म्हणजे बाहेरील ज्योतीची निरज्योत. स्वात्म अनुभव घेण्यासाठी बालरूप घेतात. चित्घन चकचकीत हि-याप्रमाणे असतात.
पांडुरंग चोख्यासाठी सर्वस्व होते. कोणताही संत असला तरी त्याला सद्गुरुविना दर्शन नाही. विठ्ठलाशिवाय त्याला दुसरे काही माहित नव्हते. सद्गुरूंनी त्याला दर्शन दिले. त्याचा मूळ उद्देश नितांत भक्ति हा होता. शुध्द नितांत भक्ति हे उच्च पातळीचे ध्येय आहे. त्या भक्तिमध्ये कोणत्याही तऱ्हेचे तरंग निर्माण होऊ देऊ नयेत.
समर्थ कस पहातात. ती ज्योत ठामपणे आहे, निष्कलंक आहे कि मायावी आहे? तुम्ही श्रद्धेने आपल्या कर्तव्याने वाटचाल करा. ते अनंत व्यापक आहेत. अशा अनंतना सर्वस्वाची गती आहे.
कुणी निंदो वा वंदो आपला स्वहिताचा धंदा गमावता कामा नये. सद्गुरु तुमच्या पापसंचिताचा नाश करून तुम्हाला सत् पदाची ओळख करुन देतात.
आंधळ्याला ज्याप्रमाणे काठी त्याप्रमाणे भक्ताला सद्गुरु ही काठी आहे. ती ज्योत सताच्या आदेशा बाहेर नाही.
"आपण जे काही कर्तव्य करता, त्या कर्तव्यात असलेल्या काही मायावी ज्योतीना परब्रह्म म्हणजे पैसा वाटतो."
आपण जन्माला आल्याबरोबर आमच्या बरोबर काय असते? स्थूल संपत्ती नसून सत् किंवा असत् असते.
"सत् चित् झाले म्हणजे सच्चिदानंद होते."
काही मानव म्हणतात कि माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? तर आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत. वैकुंठनायक तेच समर्थ!
टायपिंग : श्री सुभाष भोसले
बुधवार, १ ऑगस्ट, २०१८
श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी
मी माझ्या सताला कसा बरे विसरू? अशी स्थिती कलीयुगी मानवाने सताप्रत केली तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही.
मानवी स्थितीप्रमाणे या कलीयुगी स्थितीत असत्य स्थितीसाठी सर्वस्व स्थिती मुक्त आहे. परंतु सत्य स्थितीसाठी अनेक अडचणी आहेत.
कारण हे प्रथमपासूनच आहे. सत्य हे सत्यच आहे. ते कदापिही लोपत नाही आणि कितीही लोपविण्याचा प्रयत्न केला तरी ते लोपून रहाणार नाही.
मानवाला जेंव्हा दु:खमय स्थिती प्राप्त होत असते तेव्हाच त्याला सताप्रत प्रणव देण्यास उसंत मिळते. जेंव्हा मानवाला दु:खमय येणे आफत स्थिती प्राप्त होते तेव्हा त्याला सताची आठवण करण्यास पूर्णत्वाने उसंत मिळते.
परंतु अशी स्थिती न करता दु:खातूनही आणि सुखातूनही सताला कधी विसरू नये. अशी जेंव्हा स्थिती होते तेंव्हा सत् त्या ज्योतीपासून कदापिही दूर जात नाही. सताला दूर कोण करीते? तर मानवच करीतो.
सत् मानवाला स्वयंम् स्थितीत घेण्याची स्थिती करीत असते. सत कधीही आपल्या सेवेक-याला अती कष्टात जाऊ देत नाही. परंतु सेवेकरी पूर्णाची स्थिती दुय्यम करून अती कष्टात जातो. सताने एकदा का प्रणव दिधले तर ते पूर्णत्व करण्यासाठी सत् पराकाष्ठा करीत असते. परंतु मानव अतीमायेच्या आहारी जाऊन स्थिती करीतो.
टायपिंग: श्री सुभाष भोसले
मंगळवार, ३१ जुलै, २०१८
श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी
ज्या अवधीत रागाची स्थिती होईल त्या अवधीत नामस्मरणाची स्थिती करणे. मग राग आपणापासून दूर जाईल. रागाने जो या देहाचा नाश करतो तो या भूतलावर सुक्ष्म गतीने अती दु:खमय स्थिती प्राप्त करून घेत असतो.
मानवाने लीनतेने राहिले पाहिजे. स्थानावरून सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. जो लीनतेने; शांततेने स्थितीत राहील त्याच्यापासून सत् कदापिही दूर जाणर नाही. मानवाने आचरण करताना प्रथम लीनता पत्करली पाहिजे. जरी कलीयुगी स्थिती असली तरी आपण सत् सानिध्यातल्या ज्योती आहात. लीनतेने आचरण होईल त्यावेळी आपण सताला ह्रदयस्थ स्थितीत साठवून ठेवाल. अहंभाव असेल तर सत् आपणाप्रत रहाणार नाही. म्हणून अहंमतेचा नाश करून लीनतेने स्वीकार करा. मनन स्थितीत जर समाधान युक्त स्थिती असेल तरच मनन स्थिती स्थिर राहील.
माया ही चीज किती गंभीर आहे, अन् ही माया मानवाला सतापासून दूर नेते. मायेत गढून गेल्यानंतर मानवाला कल्पना येत नाही. जी स्थिर, शांत माया आहे तीचा मानव विचारही करीत नाही. सत् आपणास पदोपदी प्रणव देत होते मायेपासून दूर रहा. माया चंचल आहे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले
